जनहित’चे मोहोळ तहसीलसमोर बेमुदत धरणे आंदोलन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील सीना व भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणावर माती खरडून वाहून गेली असून, शासनाने पाच एकराचा निकष न लावता ज्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्रानुसार सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सीना नदीकाठच्या अर्जुनसोंड, सावळेश्वर, मुंढेवाडी, नांदगाव, वडवळ, कोळेगाव, आष्टे, घाटणे, भोयरे, एकुरके, नरखेड आदी गावांतील तसेच भोगावती नदीकाठच्या वाळूज, देगाव, डिकसळ व इतर गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी भयानक आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच आष्टे व विरवडे बुद्रुक येथील शेतकरी व नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. या बाधितांना नियमाप्रमाणे दहा किलो रेशन मिळाले असताना, तातडीची दहा हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप देण्यात आलेली नाही. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने दहा हजार रुपये जमा करावेत. यासोबतच आष्टे व विरवडे बुद्रुक येथील ग्रामसेवकांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
वाघोली, टाकळी, पेनूर व शेटफळ मंडलातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, मात्र अद्याप भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने नुकसान भरपाई जमा करावी, अशी मागणीही यावेळी प्रशासनाकडे करण्यात आली.
या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष नाना मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष नाना रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तळेकर, बिरू वाघमोडे, गणेश चवरे, मानाजी चवरे, समाधान रणदिवे, नाना वाघमोडे, लखन घाटे, विष्णू मेलगे, सोमनाथ गावडे, बंडू गावडे, सुरवंता नरुटे, दत्तात्रय व्यवहारे, प्रमोद हावळे, नवनाथ हावळे, शाहू चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
.png)
0 Comments