छाननीत जिल्हा परिषदचे ७, पंचायत समितीचे १७ अर्ज नामंजूर
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया माळशिरस येथे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या छाननीदरम्यान जिल्हा परिषदेच्या तीन गटांतील सात उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याने ते थेट निवडणूक रिंगणाबाहेर फेकले गेले आहेत. तसेच पंचायत समितीच्या १२ गणांमधील १७ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हा परिषदेच्या एकूण नऊ गटांसाठी ९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीदरम्यान विविध तांत्रिक व कायदेशीर त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे, वैध प्रमाणपत्रांचा अभाव तसेच इतर नियमभंगाच्या कारणांमुळे ७ अर्ज नामंजूर करण्यात आले. परिणामी आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात ८७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. काही गटांमध्ये उमेदवारांची संख्या मर्यादित झाल्याने तेथे थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या १८ गणांसाठी १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत १२ गणांतील १७ अर्ज बाद करण्यात आल्याने आता पंचायत समिती निवडणुकीसाठी १३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. काही गणांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज बाद झाल्याने तेथील निवडणूक समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. नामंजूर झालेल्या अर्जांबाबत संबंधित उमेदवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, अपील प्रक्रियेबाबत चौकशी सुरू असल्याचे चित्र होते. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी छाननी प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आल्याचे स्पष्ट केले.
अर्ज छाननीनंतर आता उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर निवडणूक प्रचाराला अधिक वेग येणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

0 Comments