माढ्यात शिंदे घराण्याची कोंडी; संजय शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून, माजी आमदार संजय शिंदे भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
माढा तालुक्यात सध्या भाजपची संपूर्ण निवडणूक धुरा रणजीतसिंह शिंदे यांच्या खांद्यावर असून, त्यांनी टेंभुर्णी, बेंबळे, मोडनिंब, उपळाई बु. आणि मानेगाव या जिल्हा परिषद गटांतील तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या १० पंचायत समिती गणांमध्ये भाजपच्या चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत.
दुसरीकडे, करमाळा विधानसभा मतदारसंघाशी संलग्न असलेल्या कुई व भोसरे या जिल्हा परिषद गटांमध्ये तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या एकूण चार पंचायत समिती गणांमध्ये माजी आमदार संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिंदे घराण्यातील वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमुळे माढ्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
याशिवाय, रणजीतसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माढ्यातील पाच जिल्हा परिषद गटांमध्ये खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार अभिजित पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार उभे केले आहेत. मात्र हे दोन्ही नेते शिंदे घराण्याचे राजकीय विरोधक मानले जात असल्याने, या पाच गटांमध्ये संजय शिंदे आपल्या चुलतभाऊ रणजीतसिंह शिंदेंसाठी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माढ्यातील निवडणूक समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र आहे.
रोडगेवर कारवाई; ‘पुढचा नंबर कुणाचा?’ अशी चर्चा
दरम्यान, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोलापूर-बार्शी, सोलापूर-पुणे आणि सोलापूर-मंद्रूप मार्गावर असलेल्या घुंगरू कला केंद्रांबाबत नागरिकांमध्ये दीर्घकाळापासून नाराजी व्यक्त केली जात होती. या केंद्रांमधून होणाऱ्या गैरप्रकारांचा ‘घुंगरांचा आवाज’ सर्वसामान्य नागरिकांना वारंवार ऐकू येत असताना, प्रशासन मात्र त्याकडे कानाडोळा करत असल्याची भावना व्यक्त केली जात होती.
मात्र महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर–बार्शी मार्गावरील खेडपाटी कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून केंद्राचा मालक अरुण रोडगे याच्यासह इतरांवर कारवाई केली. फौजदारी चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे ‘उद्योग’ चालवणारे रोडगे यांचे अनेक कारनामे गेल्या वर्षभरापासून चर्चेत होते.
विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अरुण रोडगे हे शिंदेसेना आणि काँग्रेस उमेदवारांच्या विजय मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे रोडगेवर कारवाई झाल्यानंतर आता ‘पुढचा नंबर कुणाचा?’ अशी कुजबुज राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

0 Comments