पोस्को प्रकरणी नवऱ्याला उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन- ॲड. जयदीप माने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- या प्रकरणाची हकीकत अशी की, सदर अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या आई-वडिलांनी आरोपी बरोबर लावून दिलेले होते. सदर लग्नानंतर ती सासरी नांदत होती. काही महिन्यानंतर तिला बरे वाटत नसल्याने सोलापुरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल केले होते. तेथे दाखल होताना केस पेपर वर तिच्या आधार कार्डावरून तिची जन्मतारीख नोंदवण्यात आली होती. डॉक्टरांनी तिला तिच्या आजारपणाबद्दल तपासले त्यावेळी ती गरोदर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर मुलगी जरी विवाहित असली तरी तो पोस्को अंतर्गत गुन्हा होत असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तिचा जबाब घेतला आणि त्या जबाबाच्या आधारे नवऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नवऱ्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन सेशन्स कोर्टाने फेटाळून लावला होता.
त्यानंतर नवऱ्याने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲड. जयदीप माने यांनी असा युक्तिवाद केला की, लग्न ठरविले त्यावेळी पत्नी अल्पवयीन आहे याची कल्पना आरोपीला देण्यात आली नव्हती, आरोपी निष्पाप आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. राणे तर पत्नी तर्फे ॲड. श्रुती जाधव यांनी काम पाहिले.
सदर प्रकरणी पोलिसांनी पत्नीचे आई-वडील, सासू सासरे यांच्या विरुद्ध देखील न्यायालयात दोषारोपपत्रक पाठवले आहे.

0 Comments