सोलापूर पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने गेल्या काही दिवसांत चार वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांची दारू आणि वाहने जप्त केली आहेत.
हातभट्टीवर धाड: १२८५ लिटर रसायन नष्ट : पहिली कारवाई ९ जानेवारी २०२६ रोजी सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘कवठे’ येथे करण्यात आली gएका शेतात गुळमिश्रित रसायन वापरून हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत पोलिसांनी १२८५ लिटर गुळमिश्रित रसायन आणि ८० लिटर तयार दारू असा एकूण ५२,९७५ रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. याप्रकरणी संजय गोपीचंद राठोड, कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण आणि प्रियांका कुमार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदेशी दारूच्या बाटल्यांसह दुचाकी जप्त : दुसरी कारवाई १२ जानेवारी रोजी हॉटेल अॅम्बेसेडर ते प्रभाकर महाराज मंदिर रोडवर करण्यात आली. अमोल बाळासाहेब भोसले हा इसम दुचाकीवरून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन जात असताना पकडण्यात आले. त्याच्याकडून १,०३,६६० रुपये किमतीची दारू आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली असून, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रिक्षातून होणारी दारू वाहतूक रोखली : तिसऱ्या कारवाईत गांधीनगर, अक्कलकोट रोड परिसरातून रिक्षाद्वारे होणारी दारूची वाहतूक पकडण्यात आली. नरेंद्र रामलू कोंडा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १,३२,५०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि रिक्षा जप्त करण्यात आली. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
अशोक चौकातील वाईन शॉप मालकावर गुन्हा : चौथी कारवाई कर्णिक नगर येथील स्वातंत्र्य सैनिक रिक्षा स्टॉपजवळ करण्यात आली. संदीप विष्णू शिंदे याला विदेशी दारूच्या बाटल्यांसह पकडण्यात आले. तपासात ही दारू अशोक चौकातील गोल्ड वाईन शॉपच्या मालकाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी १,१२,८८० रुपये किमतीचा माल आणि दुचाकी जप्त केली असून, जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई: ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सपोनि शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, पोसई मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

0 Comments