सीना-माढा उपसासिंचनचे पाणी सोडण्यासाठी 90 लाखांचा निधी मंजूर- रणजितसिंह शिंदे
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील तुळशी गावाच्या हद्दीतील सर्वात मोठ्या भवानी पाझर तलावात उजनी धरणातून कार्यान्वित असलेल्या सीना-माढा उपसासिंचन योजनेतून बंदिस्त पाईपलाइनद्वारे पाणी सोडण्यासाठी सन 2025-26 अंतर्गत सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने 90 लाखांचा निधी मंजूर झाला असून गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.
या पाझर तलावात उपसासिंचन योजनेतून पाणी यावे यासाठी गावातील स्थानिक नेतेमंडळी व शेतकऱ्यांनी वेळोवेळी माजी आमदार बबनराव शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.या मागणीचा गांभीर्याने विचार करुन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा भरीव निधी मंजूर केला आहे.या निधीतून सीना-माढा उपसासिंचन योजनेच्या अरण-बैरागवाडी या 7 नंबर वितरिकेतून सुमारे 700 ते 800 मीटर बंदिस्त पाईपलाईन करुन पुढे उताराला अनुसरून हे पाणी भवानी पाझर तलावात सोडण्यात येणार आहे.या भागातील सुमारे 60 ते 70 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. भूजलपातळी वाढून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.लवकरच सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले आहे.
-चौकट - सीना-माढा उपसासिंचन योजनेचे पाणी तुळशी येथील भवानी पाझर तलावात सोडून गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आम्ही जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.रणजितसिंह शिंदे यांनी पालकमंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता.त्यास यश मिळाले असून आमची मागणी लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.या पाझर तलावात पाणी आल्यानंतर गावातील भूजलपातळी,कूपनलिका व विहिरीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. गावातील बरेच क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.या पाण्याचा फायदा गावातील शेकडों ग्रामस्थ व नागरिकांनाही होणार आहे त्यामुळे चेअरमन रणजितसिंह शिंदे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ग्रामस्थ, शेतकऱ्यांसह अनेकांनी आभार मानले आहेत.
फोटो ओळी - 1) पालकमंत्री जयकुमार गोरे.
2)चेअरमन रणजितसिंह शिंदे.

0 Comments