वाराणशीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला ऐतिहासिक घाट पाडल्याचा आरोप
सत्ताधाऱ्यांनी सांस्कृतिक वारशाची लाज सोडली? तीव्र संताप व्यक्त
वाराणसी (वृत्तसेवा) :- काशी नगरी वाराणसी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला ऐतिहासिक घाट पाडण्यात आल्याचा आरोप समोर आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय इतिहासातील एक महान, धर्मपरायण आणि समाजहितदक्ष शासक असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या कार्यावरच घाला घालण्यात आल्याची भावना नागरिक, इतिहासप्रेमी आणि सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत काशी, गया, द्वारका, सोमनाथ यासह देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये मंदिरे, घाट आणि धर्मशाळा बांधून हिंदू सांस्कृतिक वारशाचे जतन केले. वाराणसीतील घाट हा केवळ दगडांचा बांधकाम नव्हता, तर मराठा इतिहास, स्त्री नेतृत्व आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक होता, असे जाणकारांचे मत आहे.
मात्र सध्या सुरू असलेल्या तथाकथित विकासकामांच्या नावाखाली या ऐतिहासिक घाटाला पाडण्यात आल्याचा आरोप होत असून, याबाबत सत्ताधाऱ्यांनी कोणतीही संवेदनशीलता न दाखवल्याची टीका होत आहे. “विकासाच्या नावाखाली इतिहास पुसण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी काशीचा पुनर्जन्म घडवला, त्यांच्या कार्याचाच अपमान केला जात आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर “सत्ताधाऱ्यांनी सगळीच लाज सोडली आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सरकारकडूनच त्याचा नाश केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचा गौरव भाषणांपुरता मर्यादित ठेवून, प्रत्यक्षात त्यांच्या कार्यावर बुलडोझर चालवला जात असल्याची टीकाही केली जात आहे.
या प्रकरणात पुरातत्त्व विभाग, वारसा संवर्धन तज्ज्ञ आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात असून, संबंधित घाट पाडण्यास परवानगी कोणी दिली, कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई झाली, याबाबत तात्काळ खुलासा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
इतिहास आणि संस्कृती जपण्याच्या नावाने राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच जर ऐतिहासिक वारशाचा नाश केला, तर भविष्यातील पिढ्यांना काय वारसा देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेविरोधात देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून, या प्रकरणावर मोठा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

0 Comments