दिपक परचंडे यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिला जाणारा भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार हा आदर्श, तंत्रस्नेही, विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षक दिपक परचंडे यांना नुकताच जाहीर झाला असून असे पत्र संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड यांनी दिपक परचंडे यांना दिले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी मंत्री, कलावंत, अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.दिपक परचंडे हे 2018 सालापासून जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा कदमवाडी नं.2 केंद्र तांदुळवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी कार्यरत आहेत.
शिक्षणाबरोबरच माणूस हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे असे समजून समाजासाठीही त्यांचे काम प्रेरक आहे. समाजातील ऊस तोडणी कामगारांची मुलं, वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची मुलं त्यांनी शाळेत दाखल करून शाळेच्या प्रवाहात त्यांना आणले. पैकी काही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षातील पूर्ण आर्थिक खर्च ते स्वतः करतात. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य ते उपलब्ध करून देतात. महाराष्ट्रासोबतच गुजरात या राज्यांमध्येही त्यांनी आपल्या कामातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पालकत्व हरवलेल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी कपडे, शैक्षणिक साहित्य, अशी ही मदत केली आहे. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी त्यांनी अन्नदान करून बांधवांना मदत केलेली आहे. रोडवर घडलेल्या अपघातातील पेशंट ना हॉस्पिटल पर्यंत सुखरूप पोहोचवून त्यांचेही जीवन वाचवण्यात त्यांना यश मिळालेले आहे. काही कठीण प्रसंगी पेशंटच्या नातेवाईकांची जेवणाची सोयही केली आहे. पर्यावरणासाठी झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा व गुजरात मध्ये धरमपूर तालुक्यात मामा भाचा, अनावल, सरवाळा या ठिकाणी वृक्षांची लागवड केलेली आहे.
दिपक परचंडे सर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2026 हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माळशिरस तालुका गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम, विस्ताराधिकारी, तांदुळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख जमादार सर, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जाधव, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, ग्रामपंचायत तांदुळवाडी सरपंच, उपसरपंच, विद्यार्थी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.
कोट :-
मला मिळालेला हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून, माझे सर्व विद्यार्थी व मला काम करण्यासाठी नेहमी साथ देणारे सर्व माझे बांधव यांना समर्पित करतो. ह्या राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारामुळे मला भविष्यामध्ये काम करण्यासाठी नक्कीच ऊर्जा मिळालेली आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना भविष्यात नक्कीच नाविन्यपूर्ण, विद्यार्थी हिताचं काम हातातून घडेल अशी आशा आहे.

0 Comments