Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वर अलंकार म्युझिक अकॅडमीच्या वतीने आज पहिले संगीतमय स्नेहमिलन

स्वर अलंकार म्युझिक अकॅडमीच्या वतीने आज पहिले संगीतमय स्नेहमिलन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुंबई येथील नामांकित स्वर अलंकार म्युझिक अकॅडमीच्या वतीने सोलापुरात प्रथमच संगीतमय स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. 21 जानेवारी 2026 रोजी डफरीन चौक येथील आयएमए हॉल येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती अकॅडमीचे प्रतिनिधी श्रीकांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वर अलंकार म्युझिक अकॅडमी ही हौशी व नवोदित गायकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी संस्था असून, सोलापूर शहरातील अनेक गायकांना गायनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तसेच सादरीकरणाची संधी दिली जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गायकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास प्रेरणा मिळत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

हे संगीतमय स्नेहमिलन केवळ आमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये विविध हिंदी चित्रपट गीतांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमात सुनील मदान, श्रीकांत कुलकर्णी, अरविंद देशमुख, डॉ. पाटणकर आणि डॉ. श्रद्धा रोडगे हे गायक सहभागी होऊन आपली गायन कला सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, श्रीकांत कुलकर्णी हे ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करणार असून, संगीतप्रेमींना त्याची विशेष उत्सुकता आहे.

यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की, गायनाची आवड असलेल्या इच्छुक गायकांनी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सुनील मदान (कुकरेजा स्पोर्ट्स) यांच्याशी संपर्क साधावा. भविष्यात अशा आणखी संगीतविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोलापुरातील संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम एक आगळा-वेगळा अनुभव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस सुनील मदान, अरविंद देशमुख यांच्यासह अकॅडमीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments