Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात कृषी तंत्रज्ञान महोत्सव २२ व २३ जानेवारीला

 सोलापूरात कृषी तंत्रज्ञान महोत्सव २२ व २३ जानेवारीला





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शबरी कृषी प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर  यावर्षी १८ व्या भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सव–२०२६ चे आयोजन दि. २२ व २३ जानेवारी २०२६ रोजी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर (सोलापूर–बार्शी रोड) येथे करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
             महोत्सवाचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी व विभागीय कृषी सहसंचालक  दत्तात्रय गावसाने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष  प्रदीप गायकवाड राहणार आहेत. २३ जानेवारी रोजी समारोप समारंभात राष्ट्रीय व राज्यस्तरीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे तर विशेष उपस्थिती म्हणून विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीनकुमार रणशूर, भारतीय भरडधान्य संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बसवराज रायगोंड ,नाबार्ड सोलापूरचे जिल्हा उप व्यवस्थापक नितीन शेळके आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत भव्य शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
            या महोत्सवाअंतर्गत केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पौष्टिक भरडधान्यांमध्ये भगर, राळा, वरई, ज्वारी, हुरड्याची व लाह्याची ज्वारी, तृणधान्यांमध्ये गहू, मका, स्वीटकॉर्न, कडधान्यांमध्ये हरभरा, तर तेलबिया पिकांमध्ये जवस, तीळ व करडई यांचा समावेश आहे. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, मिरची, कलिंगड, खरबूज, वांगी, कोथिंबीर, पालक, मेथी, शेवगा, कोबी, बीट व गाजर आदी पिकांचे सुधारित व संकरीत वाण पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच झेंडू, डाळिंब व विविध चारा पिकांचे प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली आहेत. एकूण ३६ पिकांतील ५४ वाण व २७ आधुनिक शिफारशींवर आधारित भव्य प्रात्यक्षिके या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कृषी शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत विविध कृषी निविष्ठांच्या वापराचे तुलनात्मक परिणाम प्रत्यक्ष पाहता येणार असून, क्यू.आर. कोड आधारित माहिती फलक व व्हिडीओद्वारे अद्ययावत तंत्रज्ञान माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
         जीजाई नॅनो किचन गार्डन, जैविक व नैसर्गिक शेती निविष्ठा, बीज प्रक्रिया युनिट, निंबोळी पावडर प्रकल्प, ट्रायकोडर्मा व मेटा-हायझियम उत्पादन, गांडूळखत तसेच ज्वारी, डाळिंब व सोयाबीन प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन होणार आहे.शेतकरी, युवक व कृषी विस्तार कार्यकर्त्यांसाठी हा महोत्सव अत्यंत लाभदायक ठरणार असून, या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस प्रदीप गोंजारी आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments