Hot Posts

6/recent/ticker-posts

अपक्ष असलो तरी शेतकऱ्यांचा विश्वासच माझी खरी ताकद

 अपक्ष असलो तरी शेतकऱ्यांचा विश्वासच माझी खरी ताकद




नरखेड (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नसली तरी काँग्रेसच्या विचारधारेतून आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणूनच आपण निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट करत अपक्ष उमेदवार लक्ष्मण भुजंग मगर यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासालाच आपली खरी ताकद असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मगर म्हणाले की, “आजवर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अतिवृष्टी असो वा पिक विम्याचा प्रश्न, शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत घरोघरी पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न केले. अनेक वेळा शेतकऱ्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा केला. मी केलेल्या कामाची देणगीच शेतकरी आता मतपेटीतून देणार आहेत, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”

नरखेड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवताना आपण अपक्ष असलो तरी पक्षाची ताकद आणि जनतेचा पाठिंबा पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले. “एकीकडे भाजप आणि धनुष्यबाणासारखी बलाढ्य यंत्रणा असताना देखील जनतेने अपक्ष उमेदवार म्हणून मला स्वीकारले आहे, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे,” असेही मगर यांनी सांगितले.

शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांचा पाठपुरावा केला असून, याच कामांच्या बळावर ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या विचारांशी निष्ठा ठेवत, जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नरखेड जि.प. गटातील निवडणूक रंगतदार होत चालली असून, अपक्ष उमेदवार लक्ष्मण मगर यांना मिळणारा शेतकऱ्यांचा पाठिंबा निवडणुकीत निर्णायक ठरणार असून सोलापूरच्या खासदार प्रणिती ताई शिंदे यांची ही जाहीर सभा होणार असून त्या जाहीर सभेकडे सर्व मतदारसंघातील शेतकऱ्यांचे व मतदारांचे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments