Hot Posts

6/recent/ticker-posts

सत्तेचा पिसाटलेला खेळ?, देवालाच माहिती! किती कर्तबगार नेत्यांचा बळी घेणार? दैव जाणिले कुणी?

 सत्तेचा पिसाटलेला खेळ?, देवालाच माहिती! किती कर्तबगार नेत्यांचा बळी घेणार? दैव जाणिले कुणी?





-किशोर आपटे
 बारामतीच्या हवाईपट्टीचा विकास योग्य पध्दतीने झाला नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यापासून धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही असे संशयाचे धुके आता तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत. ज्या अजीत पवार यांचे या भागातील विकासकामांवर डोळ्यात तेल घालून लक्ष होते त्यांनाच मरणोत्तर यासाठी जबाबदार धरण्याचा हा खुनशीपणाचा विचार देखील असू शकतो?. मात्र अजित पवार ही व्यक्ती ज्यांच्या डोळ्यात आणि डोक्यात कायम सलत आली त्यांच्यासाठी त्यांचे अपघाती निधन ही आसुरी आनंदाची पर्वणी असल्याचे समूह माध्यमातून पाहिले तेंव्हा ही माणसे आहेत की जनावरे असा प्रश्न उभा राहिला. सत्तेचा पिसाटलेला खेळ अश्या किती कर्तबगार नेत्यांचा बळी घेणार आहे? ते मात्र सध्या कुणालाच माहिती नाही दैव जाणिले कुणी? सत्तेच्या भुकेल्यांच्या राजकारणात ‘असंगाशी संगा’ची नको ती किंमत चुकविलेला रांगडा गडी : अजीत अनंतराव पवार! अजीत दादा!

नको ती किंमत चुकविलेला रांगडा गडी :
महाराष्ट्रात मोठी राजकीय उलाथापालथ होण्याची भाकीतं मागील महिनाभरापासून केली जात आहेत, सुनील तटकरे दादांऐवजी उपमुख्यमंत्री होवू शकतात असे राजकीय वर्तुळात कुजबूज देखील सुरू झाली होती. पण तीन दशके राजकीय पत्रकारिता करताना जर तरच्या शक्यतांवर बोलताना किमान लॉजीक असावे असे मनात आले, आणि मग अजित पवार काय करणार? असा उलट प्रश्न त्या चर्चा करणाऱ्यांना विचारला तर तो पत्रकार(?) निरुत्तर झाला. त्यानंतर आता २८ जानेवारीचा भेसूर दिवस पाहिला आणि हादरलोच! महापालिका निवडणुका आणि त्यानंतर च्या घटनाच्या मागचा नियतीचा चेहरा इतका भेसूर राक्षसी नरभक्षक असेल याची कुणी कल्पनाही केली नसेल.! महाराष्ट्राने बेभरवश्याच्या राजकीय खेळात आपला हुकूमाचा शिस्तप्रिय धडाडीचा प्रचंड अनुभवी आणि लोकांच्या हितासाठी भल्या सकाळपासून धडपडणारा अवघा ६६ वर्षाचा ऊमदा नेता गमावला आहे! हे पाहिल्यानंतर राजकीय पटलावरून पवार आणि ठाकरे ही नावे कुणालातरी पूसून टाकायची आहेत या संजय राऊत यांच्या उद्गारांना बळ मिळते!

यू टर्न घेत नेहमी वादात सापडणारे राजकीय नेते
आपल्या राजकीय निर्णयांची यू टर्न घेत नेहमी वादात सापडणारे राजकीय नेते अजित पवार यांच्या विमानाने बारामतीच्या विमानतळावर दोनदा यू टर्न घेतला पण दाट धुक्यामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमान उतरताना खड्ड्यात गेल्याने अपघातग्रस्त होवून त्यात अजीत पवार यांचा अकाली अंत झाला! असे सांगण्यात येत असले तरी हे जे काही झाले त्या घटनेबाबत संशयाचे ढग देखील दाटून आले आहेत. स्वत: शरद पवार यांनी बारामतीला घटनास्थळी जावून माहिती घेतली तेंव्हा धावपट्टीच्या बाजुला मोठ्या खड्यात विमान जावून पेटले असे सांगितल्यावर त्यांनी ‘खड्यात’ असे म्हणत आश्चर्य व्यक्त केल्याचे व्हिडीओ प्रसारित झाले आहेत. भल्या सकाळी उठून दररोज कुठल्या न कुठल्या विकासकामांना भेट देवून त्यांच्या दर्जा आणि उपयुक्ततेबाबत डोळ्यात तेल घालून लक्ष देणारे अजित दादांसारखे नेते देखील या बारामतीच्या हवाईपट्टीच्या भरावाच्या बाजुला असलेल्या खड्ड्याकडे लक्ष देवू शकले नाहीत.? आणि अखेर त्याच खड्याने त्यांचा घात केला असा काहीसा मरणोत्तर अजीत पवारांनाच दोष देण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या विरोधकांना त्यातून करायचा नाहीना अशी शंका त्यामुळे निर्माण झाली.

देशात अजितदादांसारख्याच स्पष्टवादी नेत्या ममता बॅनर्जी यांनी तर रस्त्यावर येवून दादांच्या निधनामागे राजकीय कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर मल्लिकार्जून खर्गे, अखिलेश यादव यांच्याकडूनही विरोधातील नेत्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करण्यात आली. पण दादांचे सख्खे काका आणि देशाच्या राजकारणाचे धुरंधर नेते शरद पवार यांनी मात्र अशी शंका घेवून राजकारण करू नका असे म्हणत या अपघाताची कारणे चौकशी अंती समोर येईपर्यंत काही बोलणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तरी देखील सगळीकडे हा घातपातच असल्याचा ठाम समज होण्यामागेच सारे काही सत्य दडले आहे नाही का? सारेच अविश्वसनीय! अनपेक्षीत!!

अजीत दादा चर्चेत तसे अनेक वर्ष राहिले मात्र २०१९ला नोव्हे. महिन्यात भल्या सकाळी महाविकास आघाडीचे सरकार येता येता अचानक त्यांना बाजुला टाकून ‘यू टर्न’ घेत अजीत पवार यांनी साऱ्या देशाला धक्का दिला. राजभवनावर भाजपसोबत भल्या सकाळीच कोश्यारीसमोर शपथविधी पार पाडणारे अजीत पवार यांनी त्यानंतर केवळ ८० तासांत ‘यू टर्न’ घेत भाजपला तोंडघशी पाडलं होतं. त्यानंतर पुन्हा ते केवळ आठवडाभरात चक्क उध्दव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने त्यांची उत्तम प्रशासकाची गुणवैशिष्ट्ये अनुभवली. फारसे शिक्षण नसताना वित्त आणि नियोजनमंत्री म्हणून महाराष्ट्राचे सर्वाधिक अकरा अर्थसंकल्प तयार करणारा हा नेता कपटकारस्थानाच्या राजकारणांचा बळी ठरल्याची खंत आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

खराखुरा निर्मळ मनाचा रांगडा राजकीय नेता
खराखुरा निर्मळ मनाचा रांगडा राजकीय नेता असणाऱ्या दादांना आजही शासकीय सनदी अधिकारी टरकून असायचे. मात्र हेच सनदी अधिकारी सध्या मंत्रालयात अन्य मंत्र्याच्या (अगदी भाजपच्याही) अस्तित्वाची देखील दखल घेत नसल्याचे किस्से आपण अलिकडे रोजच ऐकू लागलो आहोत. मात्र ‘असंगाशी राजकीय संग’ करण्याचा फटका दादांना बसल्याचे अलिकडेच महापलिका निवडणूकीचा निकाल आल्यानंतर राजकीय विश्लेषक म्हणू लागले होते. तर हे स्वत: दादांनीही मान्य करताना जाहीर भाषणातून ‘बाबानो हे राजकारण लय वंगाळ आहे याच्या नादी लागू नका आपला उद्योग व्यवसाय करा आणि सुखाने रहा’ असे सांगण्यास सुरुवात केली होती! त्यामुळेच त्यांनी त्यांच्या चूका सुधारण्यास सुरुवात करताना मित्रपक्षाला पुन्हा तोंडघशी पाडण्याची तयारी केली होती का? दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र करुन लढायची तयारी करत नव्याने ‘यू टर्न’ सुरू केला होता का! तोच तर त्यांच्या जिव्हारी आला नाही ना? अश्या चर्चा जनसामान्यात सुरू झाल्या आहेत.
फोन गेले. सायंकाळी सहा पर्यंत संबंधित महिला मंत्रालयात असतानाच त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू झाले होते.

पण बाया तिथच बसून होत्या सायंकाळी सातच्या सुमारास दादांचा काफिला मंत्रालयात आला तर त्या बाया पुन्हा समोर आल्या. मग दादांचा संयम सुटला ते जवळपास चिडलेच. काय झालं? अजून काम झालं नाही का? त्यांनी विचारणा केली. एक म्हातारी पुढे येत त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवून म्हणाली ‘तुला आशिर्वाद दिल्या बिगर घराकड कस जायाचा? म्हणून वाट बघत राहिलो.’  दादा असा जनसामान्यांचा कैवारी नेता होता.

त्यांना ‘पटेल’ त्यावेळी ते स्वत: लाथ मारून बाहेर काढतील!
महाविकास आघाडीमुळे ज्यांचा मनोभंग आणि सत्तेचा स्वप्नभंग झाला त्यांच्याकडून मग अजित पवार यांच्या या रांगड्या राजकारणाचा वेध घेण्यासाठी त्यांना काकांपासून दूर करून मुख्यमंत्री करण्याच्या ‘अमिशाचा खेळ’ सुरू झाला असे जाणकार सागंतात. त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या आजुबाजूच्या काही नेत्यांचा त्यासाठी नेहमी आधार घेतल्याचे सांगण्यात येते. कारण दादांना हे सांगायचे कसे? याचा मोठा पेच असल्याचे हे नेते सांगत! मात्र दादांना त्यांच्या निकटवर्तुळात असलेल्यांनी काहीही सांगितले तरी ते ‘मुंडे’ हलवतात असा अनुभव काही नेत्यांना आला होता. त्यानंतर जून २०२२मध्ये शिंदेचा सुरत व्हाया गुवाहाटी खेळ झाला आणि ते मुख्यमंत्री झाले. हीच संधी आपल्यालाही होती ती आपण गमावली असे मग दादांनी काही वेळा विरोधीपक्षात असताना सांगितले. पण नंतर त्यांनाही ते ‘पटेल’ असे प्रयत्न करण्यात आले म्हणे? मग जुलै २०२३मध्ये भाजपसोबत जात एकनाथ शिंदेप्रमाणेच पक्ष आणि चिन्ह देखील पळवायचे हे दादांच्या गळी फारसे उतरले नाही, त्यावेळी त्यांनी नाईलाजानेच हे सारे मान्य केले तरी त्यांच्या शरद पवार यांच्याबद्दलच्या भावना वेगळ्याच राहिल्या. त्यातून मग काकांचा फोटोही वापरण्याचा आणि त्यांना दैवत म्हणायचा प्रयत्न त्यांनी केला.

मात्र त्यांना त्यांच्या कच्छपी लागलेल्या काही नेत्यांबद्दल त्यांना सावध करणारे कुणी काही सांगितले तर कधीच विश्वास बसणे शक्य नव्हते. त्यांच्यासोबतचे काही लोक चुकीच्या दिशेने घेवून जातात हे त्यांना ‘पटेल’ त्यावेळी दादा असे आहेत की ते स्वत: लाथ मारून त्यांना बाहेर काढतील किंवा स्वत: तेथून बाहेर पडतील असे त्यांच्या निकटच्या एका नेत्याने त्यावेळी खाजगीत सांगितले होते. कदाचित त्या प्रक्रियेची सुरुवात महापालिका निवडणूकांच्या पराभवाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा करण्यापर्यंत जात अजित दादांकडून झाली होती. हीच गोष्ट तर नियतीला मान्य नसावी की तिने त्यांना कायमचे दूर नेले!? अशी चर्चा लगोलग सगळीकडे सुरू झाली आहे.

त्यांच्या अकाली निधनानंतर आता त्यांच्या पक्षाच्या समर्थक चाळीस(४०) आमदारांचे मंत्र्याचे नेतृत्व कुणाकडे जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच दादा गेल्यानंतर आता आगामी अर्थसंकल्प कोण मांडणार? या प्रश्नापासून त्यांच्या पक्षाच्या विधिमंडळातील गटाचे नेते कोण होणार? या प्रश्नापर्यंत अनेक प्रश्नाची भली मोठी गर्दी तयार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री बदलण्याची भाकीते करणाऱ्यांच्या बातम्या कदाचित खऱ्या होतीलही मात्र तरी आता  आणखी किती अक्राळविक्राळ रूप या बातम्या घेणार आहेत? देवालाच माहिती! पण हा सत्तेचा पिसाटलेला खेळ अश्या किती कर्तबगार नेत्यांचा बळी घेणार आहे ते मात्र सध्या कुणालाच माहिती नाही दैव जाणिले कुणी?
Reactions

Post a Comment

0 Comments