अजित पवार अनंतात विलीन..! लाडक्या नेत्याला निरोप देताना फुटला अश्रूंचा बांध
बारामती (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. गुरूवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्थ आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी अश्रू ढाळत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
मुंबईहून बारामतीकडेे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना बुधवारी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले. यानंतर संपूर्ण राज्यभर शोकाकुल वातावरण पसरले. अजित पवारांचा मृतदेह बारामती येथील पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. तेथे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
गुरुवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव सकाळी आठच्या सुमारास काटेवाडी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. बारामती येथील पेन्सिल चौकातून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांना आणण्यात आले. त्यावेळी जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायांच्या मुखातून, 'अजित दादा अमर रहे'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी उपस्थित अनेकांना त्यांचे अश्रू अनावर झाले होते. 'दादा परत या... परत या...' अशा घोषणादेखील उपस्थित जनसमुदायांकडून वारंवार देण्यात येत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. अजित पवारांचे पार्थिव मैदानात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर वैदिक पद्धतीने मंत्रोच्चार करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभुराज देसाई, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मेघना बोर्डीकर यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री नारा लोकेश, सी. एम. रमेश, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गणेश नाईक, सुशीलकुमार शिंदे, जयंत पाटील, रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, गिरीश महाजन, नीरज चंद्रशेखर, महादेव जानकर, जयकुमार गोरे, डॉ. अमोल कोल्हे, राधाकृष्ण विखे- पाटील, रितेश देशमुख, नरहरी झिरवळ, राहुल कुल, दत्तात्रय भरणे, राजेश टोपे, धैर्यशील मोहिते-पाटील, मकरंद पाटील, विजय शिवतारे, मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, राजेंद्र गवई, श्रीकांत शिंदे, डॉ. प्रीतम मुंडे, आकाश फुंडकर, निवेदिता माने, रुपाली चाकणकर, सचिन आहेर, सतीश चव्हाण, पोलिस महासंचालक सदानंद दाते, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बारामतीकरांनी पाळली शिस्त...
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जमला होता. यावेळी कोणतीही गडबड, गोंधळ न करता शिस्त पाळून त्यांच्या लाडक्या दादांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पहाटे पाच वाजल्यापासून चाहत्यांनी मैदानावर गर्दी केली होती. जसजशी अंत्यसंस्काराची वेळ जवळ येत होती, तसतसा लाखोंच्या संख्येने जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जमा होत होता. प्रत्येकाला अजित पवारांना बघण्याची शेवटची इच्छा होती. मैदान परिसरात व बाहेरच्या बाजूला अजित पवारांचे अंतिम दर्शन सगळ्यांना व्हावे, यासाठी डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महिलांची उपस्थितीदेखील मोठ्या संख्येने होती.
११ हजार पोलिसांचा बंदोबस्त...
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सबंध राज्यभरातून मिळेल त्या वाहनाने लोकांनी बारामतीकडे धाव घेतली. या पार्श्वभूमीवर बारामती शहर व परिसरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांसह पुणे पिंपरी-चिंचवड, ठाणे, कोल्हापूर, सातारा येथील पोलिसांसह राज्य राखीव पोलीस (एसआरपी) असा ११ हजारांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी स्वतंत्र वाहतुकीचेदेखील नियोजन करण्यात आले होते.
जनतेच्या मनातील नेता हरपला..
अजित पवार हे जनतेच्या थेट संपर्कातील, आक्रमक निर्णयक्षमतेसाठी ओळखले जाणारे नेते होते. बारामती आणि राज्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, 'आमचा नेता हरपला' अशा भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. अजित पवार यांच्या आठवणी आणि कार्य राज्याच्या राजकीय इतिहासात कायम स्मरणात राहतील, अशा शब्दांत नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
.png)
.png)
0 Comments