Hot Posts

6/recent/ticker-posts

काँग्रेस शक्तिप्रदर्शन करत नरखेड जि.प. गटातून लक्ष्मण मगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 काँग्रेस शक्तिप्रदर्शन करत नरखेड जि.प. गटातून 

लक्ष्मण मगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

खा. शिंदे व पवार यांच्या नेतृत्वाखाली गट जिंकणार 

मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण भुजंग मगर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज खासदार प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार व मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसने या गटात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

अर्ज दाखल करण्याच्या वेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या घोषणा, झेंडे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या निवडणुकीत नरखेड गटात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 खा. प्रणिता शिंदे यांनी लक्ष्मण मगर पक्षाचे तिकीट देताना लक्ष्मण मगर यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, “लक्ष्मण मगर हे केवळ उमेदवार नसून ते संकटाच्या काळात जनतेसोबत उभे राहणारे कार्यकर्ते आहेत. पूरग्रस्त परिस्थितीत स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, पिकविमा, अतिवृष्टीचा निधी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. अशा काम करणाऱ्या नेतृत्वाला जिल्हा परिषदेमध्ये पाठवणे गरजेचे आहे.”

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार यांनी सांगितले की, “नरखेड गटात पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. लक्ष्मण मगर यांच्याकडे काम करण्याची जिद्द, अनुभव आणि जनतेशी थेट संपर्क आहे. त्यांच्या माध्यमातून या भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”

मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ पातळीवर काम करणे आवश्यक आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन, एकजुटीने लढा दिला तर नरखेड गटात काँग्रेसचा झेंडा नक्की फडकेल.”

उमेदवार लक्ष्मण भुजंग मगर यांनी उमेदवारीबद्दल समाधान व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले, “आजपर्यंत शेतकरी असो वा सर्वसामान्य नागरिक, कोणताही प्रश्न असला तरी मी प्रत्यक्ष बांधावर, घराघरांत जाऊन तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पिकविमा, अतिवृष्टीचा निधी, पूरग्रस्तांना मदत, युवकांचा रोजगार, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधा हे माझे प्राधान्यक्रम राहतील. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”

लक्ष्मण मगर यांच्याकडे काम करण्याची क्षमता, जनतेशी असलेले नाते आणि सतत धावून जाणारे नेतृत्व असल्यामुळे काँग्रेस पक्षाने नरखेड जिल्हा परिषद गटातून त्यांना अधिकृत उमेदवारी दिल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने नरखेड जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments