‘मी कोणाला घाबरत नाही’, गुटखा खात बेताल बडबड; करणार्या कुलकर्ण्याला अखेर कलं निलंबित
इंदापूर (कटूसत्य वृत्त) :- “मी कोणालाही घाबरत नाही,” अशी मुजोरी दाखवत शासकीय कार्यालयातच गुटखा खाऊन बेताल बडबड करणाऱ्या इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी (रा. पळसदेव, ता. इंदापूर) यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. या प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाची प्रतिमा मलीन झाली होती. अखेर विभागाने कठोर पाऊल उचलत निलंबनाचे आदेश जारी केले.
ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात घडली. शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील संतोष महादेव रकटे यांनी शेटफळगढे येथील गट नंबर २५२, मो. र. नं. ५८१७/२०२१ या मूळ प्रकरणाची संपूर्ण केस नक्कल मिळण्यासाठी तब्बल तीन वेळा अर्ज केला होता. मात्र, वारंवार अर्ज करूनही नक्कल न मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली.
त्यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या तालुका उपअधीक्षकांनी मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांना तात्काळ नक्कल देण्याचे आदेश दिले. याचाच राग धरून कुलकर्णी यांनी तक्रारदाराशी उद्धटपणे वागून बेताल वक्तव्ये केल्याचा आरोप आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, कुलकर्णी यांनी कार्यालयातच गुटखा खात, “मी पळसदेवचाच आहे. खानदानी पैसेवाला आहे. माझे साडेसतरा एकर ऊस, केळी आहे. काहीही काम निघाले तर दहा–वीस लाख टाकून मोकळा होतो. गंमत म्हणून नोकरी करतो. तुम्ही साहेबांकडे कुठेही तक्रार करा, मी कोणालाही घाबरणार नाही,” अशा शब्दांत उर्मट भाषेत सुनावले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तक्रारदाराने कुलकर्णी यांनी नशापाणी केले आहे का, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांना पाचारण केले. मात्र पोलिस येण्याआधीच कुलकर्णी कार्यालयातून निघून गेल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. शासकीय सेवकाने कार्यालयीन शिस्त, आचारसंहिता आणि नागरिकांशी वागण्याच्या किमान निकषांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रकरणाची गंभीर दखल घेत भूमी अभिलेख विभागाने विवेकानंद कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश काढले.
या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील उद्धटपणा, भ्रष्ट मानसिकता आणि नागरिकांशी होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात प्रशासन गंभीर असल्याचा संदेश गेला असला, तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अंतर्गत नियंत्रण व शिस्तभंग कारवाई अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments