उमेदवार व राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण बैठक संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये आज राजकीय पक्षांचे उमेदवार, इच्छुक उमेदवार तसेच उमेदवारांचे अधिकृत खर्च प्रतिनिधी यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी निवडणूक खर्चासंदर्भातील नियम, तरतुदी व जबाबदाऱ्या याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. जवळगेकर यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख करताना सांगितले की, उमेदवारांनी प्रचारासाठी होणारा प्रत्येक खर्च नियमबद्ध, पारदर्शक आणि अधिकृत पद्धतीने करणे बंधनकारक आहे. अर्ज दाखल केल्यापासून ते १६ जानेवारीपर्यंतचा संपूर्ण प्रचार खर्च उमेदवारांनी खर्च नोंदवहीत दररोज नोंद करून निवडणूक खर्च समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.
तसेच ८ जानेवारी व १२ जानेवारी रोजी खर्च तपासणी करण्यात येणार असून, त्या वेळी उमेदवारांनी प्रचार खर्चाशी संबंधित बँक स्टेटमेंट, सर्व मूळ पावत्या, बिल्स व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिराती, सभा, वाहनांचा वापर, बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग्ज तसेच सोशल मीडिया प्रचार यासह सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद नियमांनुसार करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान खर्च नोंदवही कशी भरावी, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, खर्च निरीक्षकांकडून होणाऱ्या तपासणीची प्रक्रिया काय आहे, याचीही सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणूक खर्च नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या मार्गदर्शन बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी सर्व उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

0 Comments