भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटींची योजना पूर्ण करण्याला अन आयटी पार्क सुरू करण्याला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी जामगोंडी मंगल कार्यालयात झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, शिवराज सरतापे, सुधा अळीमोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे उपस्थित होते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टीने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याकरिता भाजपा कटिबद्ध आहे. सोलापुरात आयटी पार्कचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाकडून मागणी करण्यात येईल.
या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपने सोलापूरकरांना विकासाची साद घातली आहे. विकसित भारतासाठी विकसित सोलापूर हे ब्रीदवाक्य घेऊन भाजपा यंदा महापालिका निवडणुकीत जनतेसमोर जात आहे.
सोलापूर शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटीबद्ध असून जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यानंतर निश्चितपणे पूर्ण करेल, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
चौकट
प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक आणि इशारा
भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी न मिळूनही प्रचारात झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. परंतु पक्ष विरोधात काम करणाऱ्यांवर भाजपाकडून कारवाई करणार असल्याचा इशाराही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिला.
.png)
0 Comments