राजेंद्र गुंड यांचा पत्रकार दिनानिमित्त मानेगाव येथे सत्कार
माढा (कटूसत्य वृत्त):- पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. प्रभावी,परखड,वस्तुनिष्ठ, वास्तव व निर्भीड लेखणीच्या माध्यमातून समाजातील अनेक मूलभूत व महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात.विशेषत: सर्वसामान्य जनता व कष्टकरी शेतकऱ्यांना अनेक वेळा कोणीही वाली नसतो त्यांना शासन व प्रशासन वाऱ्यावर सोडून देते तेंव्हा प्रत्येक पत्रकाराने सर्वसामान्य व गोरगरीब जनता,शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच रस्ते,वीज,पाणी आदी समस्या प्रभावीपणे मांडून शासन व अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले तर काही प्रश्न व समस्या सहज सुटू शकतात असे प्रतिपादन माजी सरपंच शिवाजी भोगे यांनी केले आहे.
ते मानेगाव ता.माढा येथे 6 जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार राजेंद्र गुंड सर यांचा सत्कार करताना बोलत होते.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांचा सत्कार माजी सरपंच शिवाजी भोगे व माजी प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना पत्रकार राजेंद्र गुंड यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारिता करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. पत्रकारिता हे एक सामाजिक व्रत व छंद आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब जनता,कष्टकरी शेतकरी यांचे प्रश्न व समस्या वेळोवेळी मांडण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे यापुढेही समाजातील सर्व स्तरांतील लोकांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आजतागायत केलेल्या पत्रकारितेमुळे अनेक चांगले लोक व अधिकारी जोडले आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी सरपंच तानाजी लांडगे, माजी उपसभापती उल्हास राऊत,मनोहर मोटे,कोरफळचे लहू गवळी,मालवंडीचे सागर राजगुरू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments