भाजपच्या आश्वासनांवर प्रणिती शिंदेंचा हल्ला
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीच्या बाजूने स्पष्ट बहुमताची लाट उसळताना दिसत असून, या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी खासदार प्रणिती शिंदे आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या खोट्या घोषणा, सत्तेची चटक आणि त्यातून आलेला माज जनतेसमोर उघडपणे फाडून काढत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पडत असला तरी प्रत्यक्षात वास्तव मात्र कोरडेच असल्याचा आरोप खा. शिंदे यांनी केला. गेल्या अनेक वर्षांत भाजपने सोलापूरकरांना केवळ स्वप्नं दाखवली असून पाणीपुरवठा, रोजगार, वाहतूक, आरोग्य आणि उद्योग यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम झालेले नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. अपयश झाकण्यासाठी केवळ आश्वासनांची झड लावली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
विमानसेवा, आयटी पार्क, वस्त्रोद्योग आणि महामार्ग यांसारख्या घोषणांची पोलखोल करताना त्यांनी भाजपची दिशाहीनता अधोरेखित केली. सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग शक्य नसल्याचे तांत्रिक वास्तव माहीत असतानाही प्रचारासाठी अशक्य आश्वासनं दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आयटी पार्कबाबत फलकांपलीकडे काहीच अस्तित्व नसल्याचा आरोप करत, सोलापूरचा तरुण आजही रोजगारासाठी पुणे व बेंगळुरूकडे स्थलांतर करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, केवळ आश्वासन देणाऱ्यांना नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना संधी द्यावी. सोलापूर महानगरपालिका निवडणूक ही भाजपच्या अपयशावर शिक्कामोर्तब करणारी आणि काँग्रेसच्या पुनरागमनाची नांदी ठरणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

0 Comments