पालकमंत्री गोरे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी दीर्घकालीन संघर्षानंतर स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित, लोकशाहीवादी आणि न्याय्य व्यवस्था देणे ही मोठी जबाबदारी होती. यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणण्यात आली. ही राज्यघटना भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक दिपाली काळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख तसेच पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधान निर्मितीत बहुमोल योगदान दिले. संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा वारसा दिला. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, धर्म स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क दिला. त्यामुळे भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही म्हणून ओळखली जाते, असे त्यांनी सांगितले.
26 जानेवारी 1950 रोजी भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. भारतीय संविधान अंमलात आले आणि नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने स्वतःची दिशा ठरविली. विविधतेत एकता हा भारताचा आत्मा प्रजासत्ताक दिनाद्वारे अधोरेखित होतो. भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ या, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले.
देशाची, राज्याची तसेच आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना कर्तव्यांचे पालन करणे. सामाजिकता, बंधुता आणि एकात्मता जपणे. पर्यावरणाचे संरक्षण करणे. शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे. पंढरपूरची वारी मुळे जिल्ह्याला विशेष ओळख मिळाली असून पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर, ऐतिहासिक किल्ले आणि नैसर्गिक स्थळे जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्वपूर्ण स्थान देतात, असेही श्री. गोरे यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर येथे उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ व मान्यवर नागरिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बांधवांची सदिच्छा भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री श्री गोरे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर याप्रसंगी तंबाखू मुक्ती, कुष्ठरोग मुक्ती तसेच बालविवाह प्रतिबंध बाबत सर्वांना शपथ देण्यात आली.
तत्पूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या समवेत परेड निरीक्षण केले, त्यानंतर परेड चे संचलन राहुल आत्राम यांच्या नियंत्रणाखाली पार पडले. परेड पथ संचलनात पोलीस विभाग, शहर पोलीस विभाग महिला व पुरुष पथक, राज्य राखीव पोलीस दल महिला व पुरुष, शहर पोलीस दलाच्या शीघ्र प्रतिसाद दल, होमगार्ड पथक, एनसीसी पथक बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन बचाव दल पथक आदींचा समावेश होता.
पुरस्कार व सन्मान -
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद रोहिदास वाघमारे तसेच शहर वाहतूक शाखा दक्षिणचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार टोळनुरे यांना पोलीस दलात उत्कृष्ट कार्य व सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले असून यांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
तर पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी विविध क्रीडा प्रकार तसेच गुन्ह्यांचे तपास पूर्ण करण्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये श्रीमती अश्विनी दिलीप गाजरे, प्रसाद छगन मांढरे, शिवानंद सौदागरे, दत्तात्रय शंकर बोरिगिड्डे, नागेश राजाराम बनकर, नारायण विनायकराव पवार, नागनाथ जयराम खुणे आदींचा समावेश आहे.
0 Comments