महापालिका निवडणुकीसाठी नयना गुंडे मुख्य निवडणूक निरीक्षक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत मुख्य निवडणूक निरीक्षक तसेच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नयना गुंडे, आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, पुणे – यांची सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच मल्लिकार्जून माने, अपर जिल्हाधिकारी, सातारा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.
निवडणूक प्रक्रिये दरम्यान आचारसंहितेचे पालन, निवडणूक कामकाजातील पारदर्शकता तसेच निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक कामकाज पाहणार आहेत.निवडणूक संदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी, हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी त्याबाबत मुख्य निवडणूक निरीक्षक अथवा निवडणूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. दोन्ही निरीक्षक शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे वास्तव्यास असून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी तेथे उपलब्ध असतील.सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कटिबद्ध असून नागरिकांनी निर्भयपणे आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

0 Comments