शक्तीपीठ महामार्गावर थेट चर्चेचे आव्हान : माजी खासदार राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांनवर सवालांचा भडिमार
कोल्हापूर / सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. “माझ्याकडे शिष्टमंडळे पाठविण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः कोणत्याही एका टीव्ही चॅनेलवर किंवा जनसुनावणीत समोरासमोर चर्चा करावी. वेळ व तारीख कळवावी, मी चर्चेस तयार आहे,” असे स्पष्ट शब्दांत शेट्टी यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी गेल्या आठवडाभरात राज्यातील विविध भागांतून अनेक लोकांना फोन करून भेटीसाठी पाठविले जात असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला. या लोकांना “शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आवश्यक आहे” याबाबत एकच ठराविक स्क्रिप्ट देऊन पाठविले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले की, विकासाला आमचा विरोध नाही, मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी–नागपूर महामार्गाला समांतर शक्तीपीठ महामार्ग उभारण्यामागे ५० हजार कोटी रुपयांचा ढपला पाडण्याचा डाव असल्याचा संशय आहे. “मी गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाबाबत अनेक गंभीर आरोप मांडत आहे. मात्र मुख्यमंत्री महोदयांनी अद्याप एकदाही ठोस खुलासा केलेला नाही, उलट वेळकाढूपणा आणि सारवासारवच केली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
ज्यांची जमीन या महामार्गात जाणार नाही, ज्यांना थेट फटका बसणार नाही, अशा लोकांची दिशाभूल करून त्यांना माझ्याकडे पाठविण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः समोर येऊन खुली चर्चा करावी, असे आवाहन करत शेट्टी यांनी “लोकांची फसवणूक थांबवावी,” असा इशाराही दिला.
यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात १२ ठोस मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली. यामध्ये रत्नागिरी–नागपूर महामार्ग असतानाही समांतर महामार्गाची गरज, प्रतिकिलोमीटर खर्चातील प्रचंड तफावत, मराठवाड्याच्या दुष्काळावर होणारा प्रत्यक्ष फायदा, टोल वसुलीचा कालावधी, राज्याच्या कर्जबाजारी स्थितीत नव्या महामार्गाचा अट्टाहास, तसेच शेतकऱ्यांना भूसंपादनातून दीर्घकालीन आर्थिक हिस्सा देण्याचा प्रश्न यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमी खर्चात महामार्ग पूर्ण केले असताना, शक्तीपीठ महामार्गाचा खर्च इतका प्रचंड कसा?” असा सवाल करत, IIT रुरकी व IIT हैदराबाद यांसारख्या नामांकित संस्थांचा वाहतूक व टोलवसुलीवरील अभ्यास अहवाल जनतेसमोर मांडण्याची मागणीही शेट्टी यांनी केली.
“मुख्यमंत्री स्वतःला ‘मिस्टर क्लिन’ समजत असतील, तर समृद्धी महामार्गाच्या एकूण खर्चाची श्वेतपत्रिका राज्यातील जनतेसमोर सादर करावी,” अशी थेट मागणी करत राजू शेट्टी यांनी सरकारची कोंडी केली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर आता केवळ समर्थन-विरोधापुरते राजकारण न राहता, खुल्या चर्चेची आणि पारदर्शकतेची मागणी जोर धरू लागली असून, मुख्यमंत्री या आव्हानाला प्रतिसाद देतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments