राज्यातील पहिली बिनविरोध नगरपंचायत ठरली अनगर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अनगर नगरपंचायत ही भाजपची राज्यातील पहिली बिनविरोध निवडून आलेली नगरपंचायत ठरली असून, नगराध्यक्षपदासह सर्व १७ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक कामगिरी साध्य झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ तालुक्यासह अनगर ग्रामपंचायतीमध्ये राजन पाटील यांच्या लोकनेते परिवाराचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्षपदासाठी पोलिस व कमांडो बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करून इतिहास मोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र छाननीअंती त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयानेही आक्षेप कायम ठेवत अर्ज बाद ठरवला.
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा होण्याचा मान माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सुनबाई प्राजक्ताताई अजिंक्यराणा पाटील यांना मिळाला आहे. त्यांच्यासह १७ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी आज विजयाचे शिल्पकार माजी आमदार राजन पाटील यांना प्रदान केले.
या निवडणुकीत काजल राजकुमार मोरे, विशाल आप्पाराव थिटे, उमेश कल्याण भडकवाड, श्रीकांत जगन्नाथ घाटोळे, विजया भीमराव कोकरे, सीमा जयराम गुंड, वैशाली विष्णू पाचपुंड, गणेश महादेव गुंड, विठ्ठल अण्णा कारंडे, सुरेखा गजानन डिकोळे, विद्या बंडू शिंदे, विक्रम गुंड, नारायण कल्याण गुंड, शीतल तात्या गायकवाड, रूपाली सोमनाथ शिंदे, झुलेखा अनवर मुलाणी व सारंग नरहरी गुंड हे सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.निवडीनंतर नगराध्यक्षा प्राजक्ताताई पाटील यांच्यासह सर्व १७ नगरसेवकांनी गुलालाची उधळण करत व मिठाई वाटून विजय साजरा केला.
.png)
0 Comments