महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जागा वाटप बैठक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण जागा वाटप बैठक रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत पहिल्या टप्प्यात कोणता पक्ष किती जागा लढवणार, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रभागनिहाय जागा वाटपावर मंथन करण्यात आले.
बैठकीत महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने निवडणुकीत किती जागांची मागणी आहे, याबाबतचे प्रस्ताव सादर केले. उशिरा दाखल झालेल्या प्रस्तावांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाची ताकद आहे, याचा आढावा घेत विद्यमान नगरसेवक असलेल्या त्या पक्षालाच संबंधित जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मागणी केलेल्या जागांवर सखोल चर्चा झाली.
रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू असल्याने अंतिम निर्णयांचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. आज पुन्हा बैठका होणार असल्याचे समजते. हॉटेल सिटी पार्क येथे झालेल्या या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, अजय दासरी, संतोष पाटील, अस्मिता गायकवाड, दत्ता माने, काँग्रेसच्या वतीने माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अशोक निबर्गी, मनोज यलगुलवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून शहराध्यक्ष महेश गादेकर, शंकर पाटील, भारत जाधव, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार तर माकपाच्या वतीने मेजर युसूफ शेख, नलिनी कलबुर्गी, नसिमा पठाण व व्यंकटेश कोंगारी उपस्थित होते.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांनी भाजपच्या विरोधात एकत्रितपणे लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
.png)
0 Comments