अवैधवाळूसह 1 कोटी 6 लाखाची वाहने जप्त
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- इसबावी येथील जि.प. शाळेजवळ अवैधवाळू साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग प्रशांत डगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता एक जेसीबी, टिपर, टेम्पो, कार, दुचाकी वाहने, मोबाईल व वाळू असा एकूण 1 कोटी 6 लाख 8 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इसबावी पंढरपूर येथील जि.प.शाळेच्या जवळ नगरपरिषद स्वच्छता गृहाच्या मागील बाजुस पंढरपूर येथे अवैधपणे वाळू साठा करुन अवैधरीत्या वाहनाव्दारे वाहतुक करीत होते. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक, पंढरपूर यांचे पथकाने सदर ठिकाणी जावून छापा कारवाई केली असता, एक जेसेवीच्या सहायाने हायवा टिपर मध्ये वाळू (अंदाजे चार ब्रास) भरत असलेचे मिळून आले. त्यावेळी पोलीसांना पाहून एक टिपर व पांढ-या रंगाचे महिंद्रा वाहन तेथून पळुन गेले. जेसीबीच्या जवळ 04 दुचाकी वाहने मिळुन आले. जेसीबी चालक पवन रामचंद्र वागल रा. गादेगाव मिळून आला. तसेच टिपर चालक सुहास मायाप्पा काळे रा. बोहाळी सध्या शिवाजी नगर, इसबावी हा मिळून आला. तर वाळू उत्खनन करुन वाहतुक करणारे घरात लपून बसलेले आरोपी स्वप्नील सिताराम मस्के रा. गादेगाव, प्रकाश उर्फ भैय्या उत्तम गंगथडे रा. इसबावी, शुभम् प्रभाकर यादव रा. इसवावी यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी शेजारील दोन वाळू वाहतुकीसाठी वापरलेले टिपर दाखवून दिले. त्यांचेकडे टिपर चे मालकाबाबत विचारले असता, त्यांनी चेतन उर्फ तात्या धनवडे व निलेश दिगंबर शिंदे रा. इसवावी ता. पंढरपूर यांचे टिपर असलेचे सांगीतले टिपर मध्ये तीन ब्रास वाळू मिळून आली.
तर नितीन शिंदे याच्या घराच्या आवारात वाळू वाहतुकीस वापरलेला 407 टेम्पो लावलेला दिसला व घटनास्थळावरुन पळून गेलेली पांढ-या रंगाची महिंद्रा कार व अशोक लेलंड टेम्पो घरासमोर रोडवर लावलेला दिसून आला. ही वाहने निलेश उर्फ बापू दिगंबर शिंदे याची असलेची सांगीतले. तर महेश दिगंबर शिंदे, दिपक भिमराव काळे, नितिन पडळकर हे पोलीसांना चकवा देवून पळून गेले आहेत.
पोलीसांनी या कारवाई मध्ये 1 जेसीबी 16,50,000, 4 टिपर 60,00,000, 2 टेम्पो - 13,00,000, पांढ-या रंगाचे महिंद्रा कार 15,00,000, 4 दुचाकी वाहने 1,45,000, 3 ब्रास वाळू 12 हजार रुपये, 5 मोबाईल फोन किंंमत 73 हजार रुपये असा एकुण 1 कोटी 6 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल-
सुहास मयाप्पा काळे, पवन रामचंद्र बागल, स्वप्निल सिताराम मस्के, प्रकाश उर्फ भैया उत्तम गंगथडे, शुभम् प्रभाकर यादव, नितिन दिगंबर शिंदे, निलेश उर्फ वापू दिगंबर शिंदे, महेश दिगंबर शिंदे, दिपक भिमराव काळे, नितिन पडळकर, चेतन उर्फ तात्या धनवडे, यांचे विरुध्द् पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 Comments