सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाच्या पाच उमेदवारांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळविल्याने शिवसेना शिंदे गटाकडून सोलापुरात जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत दुधनी नगरपंचायतीत प्रथमेश म्हेत्रे, मोहोळमध्ये सिद्धी वस्त्रे, मंगळवेढ्यात सुनंदा अवताडे, सांगोल्यात आनंद माने तर पंढरपूरमध्ये प्रणिती भालके यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळविला. यासह शिंदे गटाचे मोठ्या संख्येने नगरसेवकही निवडून आले आहेत.
राज्यात महायुतीच्या माध्यमातून मोठा विजय मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सोलापुरात हा जल्लोष करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत पेढे वाटप, गुलालाची उधळण आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी “यह तो अभी ट्रेलर है, महापालिका अभी बाकी है…” तसेच “एकनाथ शिंदे यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या प्रसंगी ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, मनोज शेजवाल, सचिन चव्हाण, सुजीत खुर्द, श्रीनिवास संगा, जयश्री पवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments