अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीला अखेर अधिकृत मान्यता
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राज्यात बहुचर्चित ठरलेल्या अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह १७ नगरसेवकांना अखेर रविवारी निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. अनगर नगरपंचायत कार्यालयात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अहवालाच्या आधारे अनगर नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते ही प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील व उज्ज्वला थिटे यांचे अर्ज दाखल झाले होते. निवडणूक छाननीदरम्यान उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरल्याने प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आणि त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
मात्र या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्याने नगराध्यक्षांसह १७ नगरसेवकांची बिनविरोध निवड होऊनही अधिकृत घोषणा रखडली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयीन प्रक्रियेनंतर २१ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली व त्यांना नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांची नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष राजन पाटील, मुख्याधिकारी सुरेश भदर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments