Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकप्रतिनिधी व प्रशासनात समन्वयातूनच ग्रामविकास शक्य – आ.सचिन कल्याणशेट्टी

 लोकप्रतिनिधी व प्रशासनात समन्वयातूनच ग्रामविकास शक्य – आ.सचिन कल्याणशेट्टी




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट येथील पंचायत समिती कार्यालयात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना आमदार कल्याणशेट्टी यांनी गावपातळीवर विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख कसे करता येईल, यावर भर दिला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावांच्या विकासाला नवी दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, त्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध शासकीय योजनांची योग्य व प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण भागातील जीवनमान उंचावू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीदरम्यान पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य सेवा, महिला व बालकल्याण तसेच मूलभूत सुविधांच्या अंमलबजावणीला अधिक गती कशी देता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक योजनेचा लाभ थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी नियमित आढावा व पाठपुरावा आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता राखणे, निधीचा योग्य वापर करणे आणि लोकसहभाग वाढविणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने भूमिका बजावावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीस गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, उपअभियंता शरद उंबरजे, महिला व बालकल्याण अधिकारी भोसले, दयानंद परिचारक, अप्पासाहेब विराजदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील ग्रामविकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments