Hot Posts

6/recent/ticker-posts

गाडगेबाबांच्या विचारांचा दीप उजळवूया; मानवतेचा प्रकाश समाजात पेरूया-आ. खरे

 गाडगेबाबांच्या विचारांचा दीप उजळवूया; 

मानवतेचा प्रकाश समाजात पेरूया-आ.खरे 

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- “स्वच्छता, शिक्षण, सेवा, समता आणि मानवता हे राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे विचार आजच्या समाजाला अधिक गरजेचे असून ते केवळ भाषणापुरते न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. गाडगेबाबांचे विचार हे समाजपरिवर्तनाचे दीपस्तंभ आहेत. हा दीप उजळवून मानवतेचा प्रकाश समाजात पसरवूया,” असे प्रतिपादन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आ. राजू ज्ञानू खरे यांनी केले.

पंढरपूर येथे श्री. गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेत राष्ट्रसंत श्री. गाडगे महाराज यांचा ६९ वा स्मृतीदिन अत्यंत भक्तिमय, प्रेरणादायी आणि सामाजिक जाणीव जागवणाऱ्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू खरे उपस्थित होते.



आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार खरे म्हणाले की, गाडगे महाराजांनी आयुष्यभर समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा आणि विषमतेविरुद्ध लढा दिला. शिक्षण, स्वच्छता आणि सेवाभावातून समाज घडतो, हा संदेश त्यांनी कृतीतून दिला. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अमरजित पाटील, गाडगे महाराज सेवासदनचे संचालक  दिलीपराव पाचंगे, मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेच्या संचालिका  चंद्रकलाताई दिलीपराव पाचंगे,  गाडगे महाराज मिशन, मुंबईचे संस्था प्रचारक ह.भ.प. श्री. सातपूते महाराज (बाबा), स्टेशन रोड मठाचे मठाधिपती श्री. बाळकृष्ण महाराज शिरकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक  व्ही. बी. वेरूळकर सर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन, प्रेरणादायी विचारमंथन, कीर्तन व समाजप्रबोधनात्मक संदेश देण्यात आले. गाडगेबाबांच्या कीर्तनपरंपरेतून समाजाला जागृत करण्याचा त्यांचा प्रयत्न आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

या स्मृतीदिन कार्यक्रमाला प्रशालेतील विद्यार्थिनी, पालक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनानंतर झालेल्या कीर्तनात उपस्थित सर्वजण भक्तिरसात रंगून गेले.

हा स्मृतीदिन केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या विचारांची ज्योत अधिक प्रखरपणे समाजात तेवत ठेवण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी यावेळी केला. समाजप्रबोधन, स्वच्छता आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम पंढरपूरच्या सामाजिक जीवनात ठळक ठरला.

Reactions

Post a Comment

0 Comments