Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज होणार मतदान

 राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज होणार मतदान





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद आहे.

मात्र अपील दाखल करण्यात आलेल्या ठिकाणी निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत येणे आवश्यक होते. काही ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याने ही कार्यवाही नियमबाह्य ठरल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. अपील दाखल असलेल्या ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली. न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगर पंचायतच्या अध्यक्ष, सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.

सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. १६ जिल्ह्यांतील २४ नगरपरिषदांसाठी २० डिसेंबरला कोणत्या ठिकाणी मतदान होणार ते जाणून घेऊ.

सुधारित निवडणुकांसाठी मतदान

नगर परिषद (२०) – अंबरनाथ (ठाणे), कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी (अहिल्यानगर). बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची (पुणे), अनगर, मंगळवेढा (सोलापूर), महाबळेश्वर, फलटण (सातारा), मुखेड व धर्माबाद (नांदेड), निलंगा (लातूर), वसमत (हिंगोली), अंजनगाव सुर्जी (अमरावती), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), देऊळगावराजा (बुलडाणा), देवळी (वर्धा), घुग्घुस (चंद्रपूर).

नगर पंचायत (४) – नेवासा (अहिल्यानगर), फुलंब्री (छ. संभाजीनगर), रेणापूर (लातूर), बाळापूर (अकोला)

२१ डिसेंबर रोजी मतमोजणी

दरम्यान, २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल, तर सर्वच ठिकाणी मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होईल. दरम्यान, पुढील वर्षी जानेवारी महिन्यात राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. तर त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक होतील. त्यामुळे सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments