Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजप–शिवसेना युतीसाठी पहिले पाऊल

 भाजप–शिवसेना युतीसाठी पहिले पाऊल




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर शहराच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीसाठी पहिले पाऊल गुरुवारी उचलण्यात आले आहे. सोलापुरातील एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख तसेच माजी आमदार संजय कदम यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत दोन्ही पक्षांची सोलापूर शहरातील प्रभागनिहाय ताकद, संभाव्य उमेदवार, तसेच निवडणुकीतील रणनीती यावर मोकळेपणाने विचारविनिमय करण्यात आला. प्रत्येक प्रभागात ज्या पक्षाची ताकद अधिक आहे, त्या ठिकाणी योग्य निर्णय घेऊन सर्वांसामान्य तोडगा काढण्याच्या दृष्टीने दोन्ही नेते सकारात्मक भूमिका घेतील, असे यावेळी ठरले.

राज्य पातळीवर भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून जोमाने काम करत असताना, त्याच धर्तीवर सोलापूर शहरातही महायुती झाली पाहिजे, अशी दोन्ही पक्षांची भूमिका असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे जागावाटप, उमेदवार निवड आणि प्रचार याबाबत पुढील टप्प्यात सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

या बैठकीला शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, साईनाथ अभंगराव, सचिन चव्हाण, लक्ष्मीकांत ठोगे पाटील, उत्तमप्रकाश खंदारे, मनिष काळजे यांच्यासह भाजपचे शशी थोरात आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या पहिल्या बैठकीमुळे सोलापूर शहरात भाजप–शिवसेना युती प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने वातावरण तयार झाले असून, आगामी काळात होणाऱ्या पुढील चर्चांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या महायुतीचा सोलापूरच्या राजकारणावर आणि निवडणुकीतील समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments