Hot Posts

6/recent/ticker-posts

दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाने सुभाष देशमुख नाराज

 दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाने सुभाष देशमुख नाराज





विरोध असतानाही एन्ट्री दिल्याने कार्यकर्ते संतप्त


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप पक्ष प्रवेश मुंबई येथे झाला. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाने सोलापूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दिलीप माने यांनी भाजपा आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. स्थानिक पातळीवर त्यांच्यात कमालीचा संघर्ष आहे. असे असूनही विश्वासात न घेता माने यांना पक्षप्रवेश देण्यात आल्याचे देशमुख यांचे म्हणणे असल्याचे कळते.
कोण आहेत दिलीप माने?


काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठा धबधबा आहे. दिलीप माने यांनी 2009 साली दक्षिण सोलापूर मतदार संघातून निवडणूक लढवत काँग्रेसचे आमदारकी मिळवली होती. मात्र 2014 मध्ये सुभाष देशमुख यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाने सुभाष देशमुख दुखावले


विधानसभा निवडणुकीपासून माने यांचे मन काँग्रेसमध्ये रमत नव्हते. अधूनमधून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या. दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे वर्चस्व असतानाही भाजपच्या वरिष्ठ पातळीवर दिलीप माने यांना पक्षप्रवेश देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र गेल्या महिन्याभरापासून दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला दक्षिण सोलापूर मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता.
देशमुख यांचा विरोध डावलून दिलीप माने यांना भाजप प्रवेश


भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशानंतर अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांसह सर्वांचे लक्ष लागून आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments