Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजप जिल्ह्यात ३०० कोटी वाटणार!

 भाजप जिल्ह्यात ३०० कोटी वाटणार!  



“राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्टप्रथम!” आमदार उत्तम जानकरांचा स्फोटक आरोप

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेलेच असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार उत्तम जानकर यांनी केलेल्या स्फोटक आरोपाने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
“सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पैसे वाटण्यासाठी भाजपकडून तब्बल ३०० कोटी रुपये आले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान २५ कोटी रुपये देण्यात आले.”  असा गंभीर दावा जानकर यांनी केला.

निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असून राज्यातील प्रमुख नेते रणांगणात उतरले आहेत. अनेक ठिकाणी ‘लक्ष्मीदर्शन’ सुरू झाल्याच्या चर्चा भाजत आहेत.
मतदारांमध्ये “मताला १०००० ते २०००० रुपये” अशी किंमत ठरवीत असल्याचे बोलले जाते. त्यातच काही नेत्यांनी केलेल्या विधानांनी वातावरण आणखी तापले आहे.

गुलाबराव पाटील यांनी “लक्ष्मीदर्शनासाठी बाहेर झोपा” असा सल्ला दिला.
अब्दुल सत्तार यांनी “काजू–किसमिस समजून पैसे घ्या” असे सूचक विधान केले. या पार्श्वभूमीवर उत्तम जानकर यांनी केला दावा अधिकच धक्कादायक ठरला आहे.

“३० वर्षे भाजपमध्ये होतो… पण आता पक्षाची गटारगंगा झाली आहे”

जानकर यांनी भाजपवर थेट हल्ला चढवत म्हटले, “मी ३० वर्षे भाजपमध्ये होतो. तेव्हा ‘राष्ट्रप्रथम’ हा पक्षाचा आत्मा होता. पण आज भाजपचा नवा स्लोगन आहे. ‘भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम’. अटलजींची भाजप संपली. आता पक्षात भ्रष्ट लोक भरले आहेत. ही गटारगंगा झाली आहे.”

ते पुढे म्हणाले, “भ्रष्टाचार या एकाच मुद्द्यावर आज भाजप एकत्र येत आहे. नैतिकता, विचार, तत्वे यांचे अस्तित्व संपले आहे.”

“जयकुमार गोरे यांच्या भाषणातही भ्रष्ट व्यवहाराची छाया”

आमदार जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही सडकून टीका केली. “जिथे भाजप चौथ्या क्रमांकावर आहे, तिथे ‘कोणाचेही पैसे घ्या आणि मत आम्हालाच द्या’ अशी भाषा गोरे वापरत आहेत. हे राजकारणाला शोभणारे नाही.”

“सत्तेतील तीन पक्षांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही”

जानकर यांनी राज्यातील आघाडी सरकारवरही जोरदार प्रहार केला. “राज्यातील तीन पक्षांचे सरकार पक्षाघात झाल्यासारखे चालले आहे. हे सरकार जास्त काळ टिकणारे नाही. लवकरच मोठा राजकीय स्फोट होईल.” त्यांच्या या विधानाने आगामी राजकीय घडामोडींवरील चर्चा अधिकच रंगल्या आहेत.

सोलापूरात राजकीय वातावरण तापले, उत्तम जानकर यांच्या आरोपानंतर भाजपवर दबाव वाढला, निवडणूक खर्चावरील प्रश्न अधिक गंभीर बनले, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा कॅनव्हास अचानक बदलला. आगामी काही दिवसांत या मुद्द्यावरून आणखी मोठी धुरळा उडण्याची चिन्हे आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments