गद्दार नेत्यांपेक्षा दिलदार विरोधक बरा- मंगेश पांढरे
अधिकृत तिकीट न मिळाल्याने बारसकरवर थेट टीका; मोहोळच्या राजकारणात खळबळ
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तापमान चांगलंच वाढलं असून, याला आणखी उकळी आलेली आहे ती मंगेश पांढरे यांच्या संतप्त प्रतिक्रियेने. प्रभाग ६ मधून उमेदवारीसाठी अनेक वर्षे पक्षाच्या कामात झोकून देऊनही शेवटच्या क्षणी पक्षाचे अधिकृत तिकीट न दिल्याने त्यांनी “गद्दार नेत्यांपेक्षा दिलदार विरोधक बरा” अशी धडक टिप्पणी केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मोहोळच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
वर्षानुवर्षे मेहनत करूनही तिकीट नाही, नाराजीचा सूर तीव्र
मंगेश पांढरे हे मागील अनेक वर्षांपासून रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे काम करत होते. प्रभाग ६ साठी त्यांनी संघटनबांधणी, जनसंपर्क आणि विकासाच्या मागण्यांवर सातत्याने काम केले. त्यांच्या कार्याचा विचार करून उमेदवारी मिळेल, अशी त्यांना खात्री होती. परंतु ऐन निवडणुकीच्या आदल्या क्षणीच पक्षाने दुसऱ्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने ते प्रचंड निराश झाले.
याबाबत बोलताना पांढरे म्हणाले, “ज्यांच्यासाठी दिवस-रात्र काम केलं, त्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. असा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांपेक्षा सरळ मत मांडणारा विरोधकही मला अधिक दिलदार वाटतो.”
सामाजिक प्रश्नांवर सक्रिय नेतृत्वाकडून दुर्लक्ष?
मंगेश पांढरे यांनी अनगर अप्पर तहसील रद्द करण्याच्या आंदोलनात अग्रणी भूमिका घेतली होती. तसेच विविध स्थानिक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने, निवेदने आणि लोकशाही मार्गाने लढा दिला. कार्यकर्त्यांच्या मते, पांढरे यांच्या कामाची दखल न घेतल्याने अनेकजण पक्षावर नाराजी व्यक्त करत आहेत.
मोहोळच्या निवडणुकीत नवा वळण?
या घटनाक्रमामुळे पक्षांतर्गत गटबाजी, तिकीट वाटपातील असंतोष, नाराज कार्यकर्त्यांचे पुढील पाऊल. याबाबत चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या उंबरठ्यावर पांढरे यांनी केलेल्या या विधानाने बारसकर गटाचे गणितही बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत तिकीट वाटपावरून निर्माण झालेल्या या ‘गद्दारी विरुद्ध दिलदारी’च्या वादळाचा परिणाम थेट मतदारांच्या मनावर आणि निवडणुकीच्या निकालावर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments