Hot Posts

6/recent/ticker-posts

२५ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन

 २५ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनासाठी होम मैदानावर मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. हे प्रदर्शन २५ ते २९ डिसेंबर या कालावधीत पाच दिवस चालणार आहे.

सोमवारी सकाळी मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ मंडप पूजेद्वारे करण्यात आला. श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य भीमाशंकर पटणे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा समितीचे चेअरमन महादेव चाकोते,सुभाष मुनाळे, गिरीश गोरनळ्ळी, प्रकाश बिराजदार यांच्यासह इतर विश्वस्त उपस्थित होते.

दरवर्षी यात्रेनिमित्त होम मैदानाचा ताबा दीड महिन्यासाठी पंच कमिटीकडे दिला जातो. यावर्षी १५ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत होम मैदान पंच कमिटीकडे राहणार आहे. याच मैदानावर प्रदर्शनासाठी भव्य मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

हे राज्यस्तरीय प्रदर्शन कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विशेष सहकार्याने, तसेच स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या प्रदर्शनात कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र (सोलापूर व मोहोळ विभाग), रेशीम व खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन विभाग, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीयीकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालये, कृषी स्टार्टअप्स, नवउद्योजक, कृषी यांत्रिकीकरण कंपन्या, फळ रोपवाटिकाधारक व साखर कारखाने यांचा सहभाग असणार आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात पुष्प प्रदर्शन, पारंपरिक देशी बियाणे महोत्सव, तांदूळ महोत्सव, पशुप्रदर्शन, डॉग शो, कॅट शो तसेच कृषी व औद्योगिक औजारांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणून हिंदकेसरी ‘सोन्या’ बैल पाहायला मिळणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments