१५ जानेवारीला सोलापूर महापालिका निवडणूक; ९.२४ लाख मतदारांचा सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी केली जाईल. तब्बल तीन वर्षे नऊ महिन्यांच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर ही माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या निवडणुकीत २६ प्रभागांतून १०२ नगरसेवक निवडले जाणार असून, शहरातील ९ लाख २४ हजार ७०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ४ लाख ५७ हजार ९९ पुरुष, ४ लाख ६७ हजार ४७९ महिला व १३६ तृतीयपंथी मतदार आहेत.
प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या ५५५ हरकतींपैकी ४६४ मान्य, तर ९१ अमान्य करण्यात आल्या आहेत. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात हस्तांतरित झालेल्या मतदारांची संख्या ३२ हजार १४० आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाली असून अंतिम मतदार यादी २७ डिसेंबरला जाहीर होणार आहे.
चार दिवसांत मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात येणार असून अंदाजे १,०८८ मतदान केंद्रे असतील. नॉर्थकोट प्रशाला येथे निवडणूक कार्यालय राहणार असून उमेदवारी अर्ज भरणे व छाननीची प्रक्रिया तेथेच पार पडणार आहे.
सोमवारी दुपारपासून आचारसंहिता लागू झाली असून शहरातील राजकीय फलक, झेंडे व प्रचार साहित्य हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. विकासकामांचे फलक कापडाने झाकले जाणार आहेत. आचारसंहिता उल्लंघनाबाबत नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा ‘माय सोलापूर’ अॅपवर तक्रार करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.
प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ९ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी झालेला खर्च संबंधित राजकीय पक्षाच्या खर्चात धरला जाईल. यंदा अंदाजे १२०० मतदान यंत्रांची गरज भासणार असून व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, वीणा पवार, सहायक आयुक्त गिरीश पंडित यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
.png)
0 Comments