शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 16, 2025

शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको

 शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको





सांगोला (कटूसत्य वृत्त):- नागपूर-पत्रादेवी-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सोलापूर जिल्ह्यातील मूळ आरेखनात कोणताही बदल करण्यात येऊ नये. अन्यथा, बाधित तसेच महामार्गास समर्थन देणारे शेतकरी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारतील, असा गंभीर इशारा सांगोल्यातील बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

सांगोल्यात रविवार (ता. १४) रोजी शक्तिपीठ महामार्गाच्या सांगोला तालुक्यातील मार्गात बदल करू नये यासाठी बाधित शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाचे आरेखन यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे जाहीर करून त्याची प्रसिद्धी वृत्तपत्रांत केली होती. त्या मूळ आरेखनानुसार मोनार्क कंपनीमार्फत प्रत्यक्ष शेतजमिनीवर खांब उभे करून मोजणीचे काम सुरू आहे.

जिल्ह्यातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यांतील मोजणी पूर्ण झाली असून बार्शी व सांगोला तालुक्यांतील मोजणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, धाराशिवपर्यंत महामार्ग मूळ आरेखनानुसार राहील. मात्र उस्मानाबाद, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत काही प्रमाणात विरोध असल्याने आरेखनात बदल केला जाऊ शकतो, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश मोजणी पूर्ण झाल्याने उर्वरित काम तातडीने पूर्ण करून अंतर्गत मूल्यांकन करण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून उर्वरित मोजणी कामात कोणताही अडथळा येऊ न देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

तसेच मुळ आरेखनात कोणताही बदल न करता जीएमआर पूर्ण करून महामार्गाचे काम सुरू करण्यात यावे, यास शेतकऱ्यांची संपूर्ण संमती आहे. मात्र, जर आरेखनात बदल करण्यात आला, तर आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages