त्रिपुरात झालेल्या ६९व्या राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरचा दबदबा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत त्रिपुरा येथे पार पडलेल्या ६९व्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या मॉडेल पब्लिक स्कूल चा विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू मानस गायकवाड याने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक, तर सांघिक प्रकारात कांस्यपदक व आकर्षक चषक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना मानसने सहा फेऱ्यांतून साडेचार गुणांची कमाई करत वैयक्तिक गटात रौप्यपदक मिळविले. तसेच महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने नऊ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावून कांस्यपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत कांस्यपदक, तर मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत सुवर्णपदक मिळवून राज्याचे नाव उज्वल केले.
महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात हर्ष घाडगे (छत्रपती संभाजीनगर), मानस गायकवाड (सोलापूर), आरुष चित्रे (नागपूर), अथर्व सोनी (ठाणे) व निहान पोहाणे (नागपूर) यांचा समावेश होता. तर मुलींच्या संघात सानी देशपांडे, श्रेया हिप्परगी, सई पाटील, श्रद्धा बजाज व वैष्णवी मानकर** यांनी सहभाग नोंदविला.
मानस गायकवाड याला क्रीडा शिक्षक रविकिरण आवटे व प्रशिक्षक उदय वगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल मॉडेल पब्लिक स्कूल व संस्थेच्या वतीने मानसचे अभिनंदन करण्यात आले.
0 Comments