डॉ. द्वारकानाथ कोटणीस भारत–चीन मैत्रीचा अमर दूत- कॉ. शेख
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- भारताचे सुप्रसिद्ध मानवतावादी वैद्यकीय तज्ञ डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज त्यांच्या कार्याची आदरपूर्वक आठवण करण्यात आली. चीन–जपान युद्धकाळात रणांगणावर अखंड सेवा देत त्यांनी हजारो सैनिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या अतुलनीय मानवी सेवेमुळे चीनमधील जनतेने त्यांना “भारतीय देवदूत” अशी गौरवपूर्ण उपाधी दिली.
या प्रसंगी सीटूचे महासचिव कॉ. एम. एच. शेख यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
1910 मध्ये सोलापूर जिल्ह्यात जन्मलेले डॉ. कोटणीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वैद्यकीय मदत पथकासोबत 1938 मध्ये चीनमध्ये गेले. युद्धस्थितीत दिवस-रात्र शस्त्रक्रिया करून जखमी सैनिकांना जीवनदान देण्याचे त्यांचे कार्य विलक्षण होते. सलग 24 ते 36 तास सेवा देण्याची त्यांची क्षमता अद्वितीय असल्याचे कॉ. शेख यांनी नमूद केले.
मंगळवार, 9 डिसेंबर रोजी डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. कोटणीस स्मारक येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या वेळी माकपचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर यांनी त्यांच्या चीनमधील कार्याचा आढावा घेताना सांगितले की, सेवाकाळात त्यांनी तेथील युवती गू क्विंगलान यांच्याशी विवाह केला. सेवेत झटताना झालेल्या अतिश्रमांमुळे 1942 मध्ये अवघ्या 32व्या वर्षी त्यांचे निधन झाले, ही बाब त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.
आजही चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये त्यांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारके, रुग्णालये आणि विविध उपक्रमांमधून त्यांचे कार्य जिवंत ठेवले गेले आहे. डॉ. कोटणीस हे भारत–चीन मैत्रीचे प्रतीक, त्याग आणि मानवसेवेचे उत्तुंग उदाहरण असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमाला नसीमा शेख, सुनंदा बल्ला, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम, दत्ता चव्हाण, लिंगवा सोलापूरे, बालकृष्ण मल्याळ, डी. रमेश बाबू, विजय हरसुरे, अभिजित निकंबे, विजय मरेड्डी, अंबादास बिंगी, नरसिंग म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच अशोक बल्ला, अकील शेख, मल्लेशाम कारमपुरी, शिवा श्रीराम यांचीही उपस्थिती नोंदवण्यात आली.
.png)
0 Comments