आ. रणजितसिंह यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत उपस्थित केला प्रश्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टी व महापुराच्या फटक्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली प्रचंड हानी उघडकीस आली असताना, या संदर्भात तातडीने सुधारणा व निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनात महत्त्वपूर्ण तारांकित प्रश्न उपस्थित केला.
जिल्हा परिषद क्षेत्रातील तब्बल ४७८ रस्ते व पुलांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते उखडून गेले असल्याने शाळा, रुग्णालये, बाजारपेठ व इतर अत्यावश्यक सेवांकडे जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.या भीषण नुकसानीवर आमदार मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनस्तरावर उपाययोजना करून नुकसानग्रस्त रस्ते व पूल यांच्या पुनर्बांधणीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.तसेच अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अशा घटना वारंवार टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन म्हणून अतिवृष्टीनंतर भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मजबूत ‘क्लायमेट-रेझिलिएंट’ (हवामान-सहनशील) रस्ते तयार करण्याबाबत आधुनिक तांत्रिक बदल स्वीकारण्याची मागणी केली.
या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाला असून शासनाने तातडीच्या दुरुस्तीकरिता प्रास्ताविक मागणी पुनर्निर्माण विभागाकडे पाठवली असून, नुकसानभरपाई व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे.भावी काळात अतिवृष्टीच्या आपत्तीत रस्त्यांचे नुकसान कमी होण्यासाठी ‘बॉक्स कल्व्हर्ट’ किंवा लहान पुलांची उभारणी करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता तातडीच्या आणि ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे आमदार मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य देत शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामांना वेग द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.
.png)
0 Comments