सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलनासाठी सोलापूर जिल्हयासाठी शासनाने रुपये १ कोटी ७२ लाख इतके उद्दिष्ट दिले आहे. मागील वर्षी शासनाने दिलेल्या एक कोटी ७२ लाख उद्दिष्टापेक्षा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दोन कोटी १७ लाख १५ हजार ४७० म्हणजेच उद्दिष्टाच्या १२६टक्के पूर्तता झालेली आहे. तरी सन २०२५ निधी संकलनाचे उद्दिष्ट सर्व शासकीय यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन एनसीसीच्या महाराष्ट्र बटालियन ९ चे कमान अधिकारी कर्नल रणधीर सतीश यांनी केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम आज बहुउद्देशीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कर्नल रणधीर सतिश, कमान अधिकारी, ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशासकीय अधिकारी, ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सोलापूर ले. कर्नल शरब बाचर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (निवृत्त),पोलीस उप आयुक्त अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, सोलापूर शहर वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक ,राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० सोरेगांव, सोलापूर दिलीप तडाखे, नालसा विधिज्ञ लक्ष्मण पाटील, अध्यक्ष, माजी सैनिक संघटना सोलापूर अरुणकुमार तळीखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी जिल्हयातील विविध शासकीय,निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख,प्रतिनिधी, इतर विविध संस्था व शाळा,महाविदयालयाचे विद्यार्थी तसेच ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सोलापूर व ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कैडेट आणि जिल्हयातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिकांच्या विधवा पत्त्नी, विशेष गौरव पुरस्कारकर्ते व तालुकानिहाय माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने व शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहून करण्यात आली.
ध्वजदिन २०२५ निधी संकलनाचा शुभारंभ कर्नल रणधीर सतिश, कमान अधिकारी, ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सोलापूर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना कर्नल रणधीर सतिश म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकुल अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहीद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्याप्रती जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जात असल्याने या निधीच्या संकलनात सर्वानी योगदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलनासाठी सोलापूर जिल्हयासाठी शासनाने रुपये १ कोटी ७२ लाख इतके उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि), यांनी ध्वजदिनाचे महत्व सांगुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनाविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निची संकलनामध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागातून सोलापूर जिल्हयानी सर्वात जास्त निधी संकलन करून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्याअनुषंगाने १० डिसेंबर २०२५ रोजी लोकभवन, मुंबई येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ २०२५ मध्ये जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, ध्वजदिन निधी कल्याण समिती कुमार आशीर्वाद व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (निवृत्त), यांचा मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आचार्य देवव्रत यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करून गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सोलापूर जिल्हयाकरीता गौरव व अभिानाची बाब ठरत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिध्देश्वर इंग्लिश मेडीयम हायस्कूलच्या सह शिक्षिका अंजली खानापूरे, सह यांनी केले. सदर कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथील सर्व कर्मचारी वृंदांनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पवार संजीव व्यंकटराव यांनी व्यक्त केले.
0 Comments