मोहोळमध्ये निवडणूकपूर्व कडेकोट बंदोबस्त
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच निवडणुका पूर्णपणे निकोप, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने सज्जता दाखवली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मोहोळ शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांच्या सूचनेनुसार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या उपस्थितीत मोहोळचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
रूट मार्चदरम्यान शहरातील महत्त्वाच्या चौक, मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ आणि संवेदनशील भागांत पोलिस दलाने पायपीट करत परिस्थितीची पाहणी केली. आगामी मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अपप्रवृत्तीचा प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांनी शक्तीप्रदर्शन करत नागरिकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली.
रूट मार्चनंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात भेट देऊन निवडणूक बंदोबस्ताची सविस्तर माहिती घेतली. पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी मतदानाच्या दिवशीच्या सुरक्षा व्यवस्थेचा आराखडा, संवेदनशील केंद्रांची यादी, गस्त पथके, चोखंदळ फौजफाटा, तसेच शंका आधारित कारवाईची तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली.
एसपी कुलकर्णी यांनी आवश्यक त्या सूचना देताना सांगितले की, “मतदान शांततेत, निर्भयतेत व पूर्णपणे पारदर्शक वातावरणात पार पडले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना स्थान दिले जाणार नाही. नागरिकांनी भीती न बाळगता मतदान करावे, पोलिस दल संपूर्णपणे सज्ज आहे.”
दरम्यान, शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या रूट मार्चचे स्वागत केले असून निवडणुकीदरम्यान शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा तैनात झाली आहे.
मोहोळमध्ये निवडणूकपूर्व कायदा-सुव्यवस्थेचा ताण लक्षात घेता घेतलेला हा रूट मार्च अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणूक प्रशासन आणि पोलिसांची समन्वयाने तयार झालेली तयारी लक्षवेधी ठरत आहे.

0 Comments