डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे जागतिक संदर्भ' विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मनः डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ' या महत्त्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद दि. ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अरब अमेरिकन विद्यापीठाचे डॉ. अयमान इसुफ हे विशेष पाहुणे असणार आहेत. कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ' ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सामाजिक न्याय, समानता, लोकशाही, अर्थकारण आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार आज केवळ भारत देशापुरते मर्यादित नसून, ते जागतिक स्तरावर मानवमुक्ती आणि प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. याच विचारांना वैश्विक स्तरावर अधिक दृढ करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ४ डिसेंबर रोजी अत्यंत महत्त्वाचे सत्र 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचार' या विषयावर डॉ. विजय खरे मांडणी करणार आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीवादी, मानवी हक आणि मानवी स्वातंत्र्यासाठी विषयक विचार या विषयावर डॉ. सुमित म्हसकर, भदंत धम्मनाग, डॉ. प्रकाश पवार, डॉ. वैशाली प्रधान आदी मांडणी करणार आहेत. दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी आंबेडकरवादी प्रबोधनातून सामाजिक परिवर्तनः शिक्षण आणि आर्थिक न्याय या विषयावर प्रशांत रणदिवे, डॉ. त्रिनाध, डॉ. प्रशांत बनसोडे सविस्तर मांडणी करणार आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता एक चळवळ मूकनायक ते प्रबुद्ध भारत या विषयावर डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. रवींद्र चिंचोलकर विषयाची मांडणी करणार आहेत. दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी डॉ. जयभीम शिंदे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ दिनांक ५ डिसेंबर रोजी होणार आहे. या समारोपाला माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिका येथील टेक्सास विद्यापीठातील डॉ. स्कॉट स्ट्राऊड मार्गदर्शन कणार आहेत.
ही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वर्तमानकालीन प्रासंगिकतेवर भर देईल. त्यांच्या विचारांची जागतिक स्तरावर होणारी स्वीकारार्हता आणि त्यांचे बहुआयामी दृष्टिकोन या परिषदेत नव्याने मांडले जातील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वव्यापी विचारांचा अभ्यास करण्याची आणि त्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक व राष्ट्रीय विकासाला चालना देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर अभ्यास करणारे संशोधक, विचारवंत, पत्रकार, विद्यार्थी आणि सर्व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. गौतम कांबळे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. तेजस्विनी कांबळे, प्रा. सागर राठोड, डॉ. अंबादास भास्के, प्रा. विठ्ठल एडके उपस्थित होते.
चारशेहून अधिक संशोधक, विचारवंत, अभ्यासकांचा सहभाग
या आंतरराष्ट्रीय परिषदेत विदेशातील आणि भारतातील देशातील विविध राज्यांतून ४०० हून अधिक संशोधक, विचारवंत आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. विविध परिषदेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या विविध पैलूंवर १५० संशोधन पेपरचे सादरीकरण आणि गटचर्चा होणार आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि कायदेशीर क्षेत्रातील डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचे विश्लेषण या सत्रांमध्ये होईल.
.png)
0 Comments