Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपकडे इच्छुकांचा महापूर तर काँग्रेसकडे मात्र दुष्काळ

 भाजपकडे इच्छुकांचा महापूर तर काँग्रेसकडे मात्र दुष्काळ




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील राजकीय चित्र स्पष्टपणे बदलताना दिसत आहे. सोलापूर शहरात भाजपकडे १०२ जागांसाठी तब्बल एक हजाराहून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. याउलट काँग्रेसकडे अवघे सुमारे १५० अर्ज आले असून, एका जागेसाठी एकच इच्छुक अशी परिस्थिती अनेक प्रभागांमध्ये निर्माण झाली आहे. या आकडेवारीतूनच दोन्ही पक्षांची संघटनात्मक ताकद आणि सध्याचा उत्साह स्पष्टपणे समोर येतो.


भाजपकडे प्रत्येक जागेसाठी सरासरी किमान ८ ते १० पर्याय उपलब्ध असल्यामुळे उमेदवार निवड करताना पक्ष नेतृत्वासमोर ‘सुखाचा प्रश्न’ उभा राहिला आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारांची कमतरता, स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील मरगळ ठळकपणे जाणवते आहे. पक्ष वाढीसाठी स्थानिक पातळीवर कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच व्यक्त होत आहे.

राजकीय वर्तुळात सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे. भाजपकडे आलेल्या हजाराहून अधिक इच्छुकांपैकी अनेक जणांना उमेदवारी नाकारली जाणार, हे निश्चित आहे. हेच नाकारले गेलेले इच्छुक उमेदवार पुढे काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसची उमेदवार यादी ही ‘दुसरी पसंती’ ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपच्या रणनीतीबाबत बोलायचे झाले तर, उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात पक्ष शेवटपर्यंत गोपनीयता पाळतो, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. “भाजपवाले लै बाराचे आहेत, शेवटपर्यंत यादी जाहीर करत नाहीत,” अशी प्रतिक्रिया इच्छुकांमध्ये ऐकू येत आहे. या विलंबामुळे काँग्रेसकडे जाणाऱ्या इच्छुकांची गर्दी एकाच वेळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सगळ्या घडामोडींचा एकूण अर्थ असा की, सोलापूर शहरात भाजपची संघटनात्मक ताकद आणि आकर्षण अद्याप भक्कम आहे, तर काँग्रेसची अवस्था ही प्रामुख्याने भाजपने नाकारलेल्या इच्छुकांवर अवलंबून राहणारी ठरण्याची चिन्हे आहेत. यामुळे काँग्रेससमोर केवळ निवडणूक लढवण्याचे नव्हे, तर पक्षाची विश्वासार्हता टिकवण्याचेही आव्हान उभे राहिले आहे.

एकीकडे भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आणि अंतर्गत स्पर्धा, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये मरगळ, उत्साहाचा अभाव आणि नेतृत्वाची कमतरता या विरोधाभासातूनच सोलापूरच्या राजकारणाचा आगामी काळ ठरणार आहे.निवडणूक बिगुल अधिकृतपणे वाजल्याने, राजकीय रणशिंग मात्र सोलापुरात स्पष्टपणे फुंकले गेले आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments