Hot Posts

6/recent/ticker-posts

कॉलेज तरुणांच्या गप्पांमध्ये एकच विषय—परदेशात जाण्याची तयारी : वास्तव काय?

 कॉलेज तरुणांच्या गप्पांमध्ये एकच विषय—परदेशात जाण्याची तयारी : वास्तव काय?

डॉ. भारत कऱ्हाड

आज महाराष्ट्रातील कॉलेजचे कॅम्पस, कोचिंग क्लासेस, वसतिगृहे किंवा चहाचे टपरे—जिथे तरुण एकत्र येतात, तिथे एकच विषय वारंवार ऐकू येतो—परदेशात जाण्याची तयारी. कुणी उच्च शिक्षणासाठी, कुणी नोकरीसाठी, तर कुणी कायमस्वरूपी स्थलांतराच्या विचारात आहे. हा केवळ व्यक्तीगत स्वप्नांचा विषय नसून, महाराष्ट्रातील रोजगार आणि विकासवास्तवावर उमटलेली ही सामूहिक प्रतिक्रिया आहे. प्रश्न असा आहे की संधींचे केंद्र मानल्या जाणाऱ्या राज्यातून तरुण बाहेर का पडू पाहत आहेत?

महाराष्ट्र उद्योग, वित्त, शिक्षण आणि सेवाक्षेत्रात आघाडीवर आहे, असे नेहमी सांगितले जाते. तरीही शिक्षित तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढताना दिसते. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर नोकरी मिळतेच असे नाही; आणि मिळाली तरी ती कराराधारित, कमी वेतनाची किंवा कौशल्याशी विसंगत असते. परिणामी, “इथे मेहनत करूनही पुढे जाणार कसे?” हा प्रश्न तरुणांच्या मनात खोलवर रुजतो.

ग्रामीण आणि निमशहरी महाराष्ट्रात ही अस्वस्थता अधिक तीव्र आहे. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था बदलते आहे, पण त्या बदलाला पूरक रोजगारनिर्मिती होताना दिसत नाही. उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या संधी काही मोठ्या शहरांपुरत्याच मर्यादित राहिल्याने, स्थानिक पातळीवर तरुणांसमोर पर्याय उरत नाहीत. आधी शहरांकडे, मग परदेशाकडे—हा प्रवास अनेकांसाठी अपरिहार्य वाटू लागतो.

परदेश लांतराचे आकर्षण केवळ जास्त पगारापुरते मर्यादित नाही. तिथे कौशल्याला मिळणारी किंमत, कामाची शिस्त, स्पष्ट करिअर मार्ग आणि सामाजिक सुरक्षिततेची भावना तरुणांना भुरळ घालते. महाराष्ट्रात मात्र अनेक तरुणांना मेहनत असूनही प्रगतीचा मार्ग अस्पष्ट वाटतो. संधी ओळखीवर अवलंबून असल्याची भावना, धोरणांतील अनिश्चितता आणि सतत बदलणारे नियम ही अस्वस्थता वाढवतात.

या स्थलांतराचे परिणाम केवळ वैयक्तिक पातळीवर थांबत नाहीत. कुटुंबे दूरावतात, गावं–शहरं कुशल मनुष्यबळ गमावतात आणि राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्जनशील ऊर्जा बाहेर जाते. दुसरीकडे, परदेशात गेलेल्यांच्या यशाच्या कथा मोठ्या प्रमाणावर पुढे येतात; मात्र त्यामागील संघर्ष, खर्च, मानसिक ताण आणि अपयशाच्या शक्यता क्वचितच चर्चेत येतात. प्रत्येकासाठी परदेश म्हणजे यशाचा शॉर्टकट नसतो, हे वास्तव अनेकांना उशिरा उमगते.

शासनाकडून रोजगारनिर्मितीच्या घोषणा होत असतात; मात्र त्या जमिनीवर कितपत उतरतात, हा प्रश्न कायम आहे. कौशल्य विकास आणि उद्योग यांचा समन्वय अपेक्षेइतका प्रभावी नाही. शिक्षणसंस्था जे शिकवतात आणि उद्योगांना जे अपेक्षित आहे, त्यातील दरी अजूनही भरून निघालेली नाही. ही दरी कायम राहिली, तर बेरोजगारी आणि स्थलांतराचा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे.

तरुणांनीही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. केवळ पदवीपुरते न थांबता कौशल्य, सातत्याने शिकण्याची तयारी आणि वास्तवाची जाणीव विकसित करावी लागेल. मात्र हे घडण्यासाठी अनुकूल वातावरण, स्पष्ट धोरणे आणि संधींची उपलब्धता निर्माण करणे ही शासन, उद्योग आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

महाराष्ट्रासमोर आज खरा प्रश्न असा आहे की परदेशस्थलांतर हा तरुणांसाठी एक पर्याय राहील की हळूहळू एक मजबुरी बनेल? जर सक्षम, शिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेर जात राहिले, तर त्याचा परिणाम केवळ रोजगारावर नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक भवितव्यावरही होईल.

तरुणांना महाराष्ट्रातच आपले भविष्य सुरक्षित, सन्मानजनक आणि आशादायी वाटेल—अशी परिस्थिती निर्माण करणे हेच खऱ्या अर्थाने विकासाचे लक्षण ठरेल.


— डॉ. भारत कऱ्हाड

प्राचार्य, वराडकर महाविद्यालय, दापोली

जिल्हा रत्नागिरी

Reactions

Post a Comment

0 Comments