Hot Posts

6/recent/ticker-posts

महायुतीत तणाव उफाळला; ‘भाजप आपले खरे रंग दाखवते’ रोहित पवारांचा घणाघात

 महायुतीत तणाव उफाळला; ‘भाजप आपले खरे रंग दाखवते’ रोहित पवारांचा घणाघात


पूणे (कटूसत्य वृत्त):- अलीकडेच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांनंतर महायुतीतील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला असून, भाजपच्या भूमिकेवर आता त्यांच्याच मित्र पक्षांनी अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. भाजप आपला स्वार्थ साधून झाला की मित्र पक्षांना बाजूला सारते, हे आता उघडपणे दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील फेसबुक पोस्टद्वारे भाजप आणि महायुतीतील घडामोडींवर तीव्र टीका केली. नगरपरिषद निवडणुकांदरम्यान महायुतीतील नेत्यांनीच भाजपबाबत केलेली वक्तव्ये ही भाजपच्या ‘खऱ्या चेहऱ्याचे’ दर्शन घडवणारी असल्याचा दावा त्यांनी केला. “स्वार्थ साधला गेला की भाजप आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करते, यावर त्यांच्याच मित्र पक्षांनी शिक्कामोर्तब केलं आहे,” असे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर काल निवडणुका जाहीर होताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये महायुतीत निवडणूक लढवली जाणार नसल्याची घोषणा थेट मुख्यमंत्री स्तरावरून करण्यात आल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. ही घोषणा केवळ राजकीय निर्णय नसून, महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी मित्र पक्षाला अलगदपणे वेगळे पाडण्याची रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला.

“आधी मित्र पक्षांना ‘कुबड्या’ म्हणून हिणवायचे आणि नंतर त्यांनाच बाजूला सारायचे. भाजपने आपल्या एका मित्रपक्षाला जाणीवपूर्वक वेगळे पाडले. ही राक्षसी महत्त्वाकांक्षा नाही तर काय?” असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपची ही भूमिका सत्ता केंद्रीत ठेवण्याच्या हव्यासातून प्रेरित असल्याचे त्यांनी सूचित केले.

रोहित पवार यांनी पुढे इशाराही दिला की, भाजपच्या याच महत्त्वाकांक्षी आणि मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देणाऱ्या वृत्तीमुळे भविष्यात राजकीय चित्र बदलू शकते. “२०२९ मध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल,” असा ठाम अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, महायुतीतील एकजूट, विश्वास आणि भविष्यातील सहकार्य यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच हे मतभेद उघड झाल्याने आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठे धक्के आणि नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments