नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार थेट खरेदी-विक्री
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील गावठाण भागात जागेची कमतरता असल्याने अनेक नागरिकांनी शहराच्या हद्दीत एक-दोन गुंठे जागा खरेदी करून स्टॅम्पवर नोटरी व्यवहार केले होते. गुंठेवारीस परवानगी नसल्यामुळे अशा जागांना अधिकृत मालकी हक्क, प्रॉपर्टी कार्ड तसेच बँकांकडून गृहकर्ज मिळत नव्हते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत नोटरीवर जागा घेतलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीच्या हद्दीत १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत नोटरीद्वारे केलेले गुंठेवारीचे व्यवहार आता नियमित करता येणार आहेत. संबंधित व्यक्तीस जागेच्या चालू बाजारमूल्यानुसार स्टॅम्प ड्यूटी तसेच नोटरी केलेल्या तारखेपासून मुद्रांक शुल्कावर दरमहा दोन टक्के दंड भरावा लागणार आहे. ही रक्कम जिल्हा मुद्रांक शुल्क कार्यालयात भरल्यानंतर त्या जागेची अधिकृत खरेदी मान्य होणार आहे.
या निर्णयामुळे २० ते २५ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या गुंठेवारीच्या जागा, ज्या आतापर्यंत परवानगीअभावी विकता येत नव्हत्या, त्या आता थेट खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र, नव्याने गुंठेवारी करून जमिनीचे तुकडे विकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी अनिकेत बनसोडे यांनी स्पष्ट केले.नियमितीकरणानंतर जागा मुद्रांकित होऊन संबंधित व्यक्तीस अधिकृत मालकी हक्क मिळणार असून, भविष्यात बँक व्यवहार व इतर कायदेशीर प्रक्रिया सुलभ होणार आहेत.
पूर्वी खरेदी केलेल्या दोन-चार गुंठे जागांची थेट खरेदी-विक्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीस सातबारा उतारा, आठ-अ, सहाड तसेच जागेचा झोन नकाशा ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात जागेच्या मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्यूटी भरून गुंठेवारीची विक्री करता येणार आहे.
.png)
0 Comments