युती ठरली नाही तर शिवसेनेची पहिली यादी जाहीर होणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने महायुतीकडे प्रस्ताव दिला असून तो मान्य झाल्यास युती होईल, अन्यथा २५ डिसेंबरनंतर शिवसेना स्वबळावर निवडणुकीची तयारी वेगाने सुरू करेल, असे स्पष्ट मत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.
२५ डिसेंबर रोजी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कदम सोलापुरात येणार असून भाजपसोबत युतीसंदर्भात अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास युती जाहीर केली जाईल. मात्र, युतीबाबत निर्णय न झाल्यास शिवसेनेची पहिली उमेदवारांची यादी तात्काळ प्रसिद्ध केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले की, आतापर्यंत ४५० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून महानगरपालिकेच्या सर्व १०२ जागांसाठी शिवसेनेची पूर्ण तयारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे. मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांमुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे प्रचार केला असून भाजपच्या आमदारांच्या विजयात शिंदेसेनेचा मोठा वाटा राहिला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक युती करण्याचे आश्वासन दिले होते, असेही शिंदे यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकास योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून सोलापूर शहरात दुहेरी पाइपलाइनद्वारे दररोज पाणीपुरवठा व्हावा यासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सोलापुरातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आयटी पार्क उभारणीसंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे यांनी सोलापूरच्या मतदारांना आवाहन करताना म्हटले की, आतापर्यंत काँग्रेस व भाजपची सत्ता शहराने पाहिली असून अपेक्षित विकास झाला नाही. आता नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने ठाण्याप्रमाणे सोलापूरचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर शिवसेनेच्या हाती महानगरपालिकेची सत्ता द्यावी. सोलापूर महानगरपालिकेत बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारांचा भगवा फडकावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
0 Comments