Hot Posts

6/recent/ticker-posts

जयंत पाटलांनी केला भाजपचा ‘कार्यक्रम’; ३० पैकी २२ जागांवर दणदणीत विजय**

 जयंत पाटलांनी केला भाजपचा ‘कार्यक्रम’; ३० पैकी २२ जागांवर दणदणीत विजय**


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :-“जयंत पाटील यांचा गेम करायचाच,” या निर्धाराने भाजप व विरोधी आघाडीने कंबर कसली होती. मात्र जयंत पाटील यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उद्ध्वस्त करत नगराध्यक्षपदासह ३० पैकी २२ जागांवर विजय मिळवून विरोधकांना धोबीपछाड दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अण्णा डांगे यांच्यासह भाजपचे सम्राट महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि सदाभाऊ खोत यांच्यासारख्या दिग्गजांनी ताकद लावली, तरीही “इथे कितीही ताकद लावा, मीच इथला सिकंदर” हे जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.

मागील पालिका निवडणुकीतील अपयश आणि विधानसभेतील निसटता विजय यामुळे जयंत पाटील अस्वस्थ असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी “मी आता पूर्णवेळ इथेच आहे” असे स्पष्ट करत, “अभी हमारा ध्यान वक्त बदलनेपर है, रंग बदलनेवालोंको हम बाद में देखेंगे,” असा थेट इशारा विरोधकांना दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य व केंद्रातील सत्तेच्या बळावर जयंत पाटलांचा ‘फायनल गेम’ करण्याचा प्रयत्न झाला. मात्र नेहमीप्रमाणेच जयंतविरोधात सर्वजण एकवटले असतानाही पाटील यांनी एका विजयात अनेकांचा ‘कार्यक्रम’ केला.

निवडणूक जाहीर होताच जयंत पाटील यांनी सर्व सूत्रे स्वतःकडे घेतली. समर्थकांनाही त्यांच्या रणनीतीचा अंदाज शेवटपर्यंत येऊ दिला नाही. सलग १८ तास उमेदवारांच्या मुलाखती, पहाटे चार वाजेपर्यंत बैठका, प्रत्येक प्रभागाचा बारकाईने अभ्यास असा त्यांचा निवडणूक सपाटा सुरू होता. भाजपचे निष्ठावान समजले जाणारे विजय कुंभार, महेश पाटील आणि एल. एन. शहा यांना त्यांनी मांडवात वाजत-गाजत आणले. त्यांना परत आणण्यासाठी भाजपकडून झालेले प्रयत्न उशिराचे ठरले.

उमेदवार निवडीत जयंत पाटलांचे ‘सिलेक्शन’ अचूक ठरले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांना प्रभागात अडकवण्यासाठी त्यांनी दिलीप पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील यांना मैदानात उतरवले. माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि अरुणादेवी पाटील यांना आघाडीवर आणत त्यांनी लढतीची धार वाढवली. डांगे गटाचे उमेदवार असणार हे लक्षात घेऊन त्यांनी अण्णा डांगेंचे एकेकाळचे निष्ठावान आनंदराव मलगुंडे यांनाच उमेदवारी देत धनगर मतांमध्ये फूट पाडण्याची रणनीती यशस्वी केली.

विरोधकांकडून उमेदवार जाहीर करण्यात झालेला विलंब आणि विश्वनाथ डांगे यांच्या उमेदवारीभोवतीचा संभ्रम पहिल्याच टप्प्यात बॅकफूटवर टाकणारा ठरला. तर पाटलांनी ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहून उमेदवार निवडले, विरोधक मात्र ‘सिलेक्टिव्ह’ उमेदवारांवर अडकले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ईश्वरपूरमधील हा दणदणीत विजय जयंत पाटील यांना नवी ऊर्जा देणारा ठरला असून, आगामी राजकीय लढतींसाठी त्यांनी आपली ताकद आणि रणनीती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments