अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी नजीब शेख यांची नियुक्ती !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करण्यासाठी दिग्गज नेतेमंडळीचा ओढा वाढताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अल्पसंख्यांकचे युवक अध्यक्ष नजीब शेख यांनी काही दिवसापूर्वीच राजीनामा दिला होता.त्यानंतर त्यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे विद्यमान शहराध्यक्ष अमीर शेख हे सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढविणार असल्यामुळे त्यांच्या शिफारशीवरून नजीब शेख यांची राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी भवनात दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते तसेच प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, मकबूल मोहोळकर, तौफिक शेख, प्रा. श्रीनिवास कोंडी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नजीब शेख यांना अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
सोलापुरात गेल्या अनेक वर्षापासून आपण काँग्रेस अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष म्हणून मोठ्या जोमाने काम केले आहे.सामाजिक कार्याबरोबरच राजकारणामध्ये सुद्धा आपण सर्वांना सोबत घेऊन आत्तापर्यंत काम करत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची ध्येय धोरणे आणि त्यांच्या कामाचा आवाका पाहून आपण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आणि आता आपल्यावर अल्पसंख्यांक विभागाची शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अल्पसंख्यांकचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण अहोरात्र काम करणार असल्याची ग्वाही नूतन अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नजीब शेख यांनी यावेळी बोलताना दिली.

0 Comments